लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील करंजफेण फाटा ते बांदिवडे गावापर्यंत अपूर्ण राहिलेल्या तीन कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. करंजफेण गावाजवळील दोन कि.मी. रस्ता मागील चार वर्षांपासून खराब झाला आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. वाहनधारक या मार्गावरून वाहन चालवताना त्रस्त होतात. या मार्गासाठी निधी मंजूर झाला असल्याचे देखील सांगण्यात येते; परंतु कोणतीही कार्यवाही नाही.
बांदिवडे गावाजवळ मागील चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकले आहेत; परंतु काम अद्याप सुरू नाही. रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून खडीचे ढीग रस्त्यात आल्यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो : करंजफेण-बांदिवडे मार्गावर रस्त्यावर खडीचे ढीग आल्यामुळे वाहतूक जीवघेणी ठरत आहे.