लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : सर्वांसाठी परवडणारी घरे या अभियानांतर्गत घरकुलांची निर्मिती व अनुदान आणि सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालाची निविदा अशा महत्त्वपूर्ण विषयांवर नगरपालिकेची शनिवारी (दि. २०) आयोजित केलेली सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. सत्तारूढ आणि विरोधक यांच्या दोन्ही विषयांवर टोकाच्या भूमिका असल्यामुळे सभेत कलगीतुरा रंगण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.सर्वांसाठी घरे २०२२ अभियानांतर्गत इचलकरंजी नगरपालिकेच्या परवडणारी घरांची निर्मिती व वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी अनुदान या दोन घटकांचे प्रकल्प अहवाल म्हाडाकडे सादर करण्याची मंजुरी मागणारा प्रस्ताव शनिवारच्या पालिका सभेसमोर आहे. सर्वसामान्य जनतेच्या घरकुलांसाठी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनेविषयी नगरपालिकेकडून आणि शासनाकडून अक्षम्य विलंब होत आहे. म्हणून नगरपालिकेत विरोधी असलेल्या कॉँग्रेस पक्षाने प्रांताधिकारी कार्यालयावर घरकुल अन्याय निवारण समितीच्यावतीने मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. या योजनेंतर्गत तीन हजार लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले असले तरी सभेसमोर ५८० घरकुलांचा प्रस्ताव असल्यामुळे सभेमध्ये सत्तारूढ व विरोधकांत खडाजंगी होणार, असे सांगण्यात येते.सरकारकडून अपारंपरिक ऊर्जा वापरण्याबद्दल प्रोत्साहन दिले जात आहे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी शहरात सुमारे ४३ कोटी रुपये खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी एकाच कंपनीकडून आलेला प्रस्ताव नगरपालिकेकडे सादर करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे नगरपालिकेस लागणारी रस्त्यावरील दिवाबत्ती आणि नगरपालिका कार्यालयाकडील वीज यांच्या खर्चामध्ये बचत होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, एकाच कंपनीचा प्रस्ताव आल्यामुळे त्यावेळी कॉँग्रेसकडूनच जोरदार टीका करण्यात आली होती. सौरऊर्जेचाच प्रस्ताव पुन्हा सभेसमोर आणल्यामुळे आता या सभेत जोरदार कलगीतुरा रंगणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.याचबरोबर शनिवारच्या सभेत शहरात नव्याने तीन ठिकाणी उद्याने विकसित करणे, सहा ते आठ उंचीची पाच हजार झाडे खरेदी करून त्याचे रोपण करणे, आदी प्रस्तावांवरसुद्धा जोरदार चर्चा होणार असल्याने ही सभा निश्चितपणे वादळी ठरणार, असा दावा केला जात आहे.शहरात नव्याने तीन ठिकाणी उद्याने विकसित करणे, पाच हजार झाडे खरेदी करून त्याचे रोपण करणे, आदी प्रस्तावांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता
घरकुलासह सौरऊर्जेवरून सभेत रंगणार कलगीतुरा
By admin | Published: May 19, 2017 1:04 AM