प्रवीण देसाईकोल्हापूर : महापुरामुळे शिरोली येथे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील गेले सात दिवस ठप्प असलेली वाहतूक सोमवारी सुरू झाली. ही वाहतूक सुरळीत करण्यामध्ये जिल्हा व पोलीस प्रशासनाला मदत करण्याची महत्त्वाची भूमिका कर्जत (जि. रायगड) येथील रक्षा सामाजिक विकास मंडळच्या स्वयंसेवकांनी बजावली. रविवारी (दि. ११) रात्रीपासून या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. महापुरातील कोल्हापूरकरांसाठी काहीतरी करायचं या भावनेतून त्यांनी केलेले काम न विसरण्याजोगे आहे.कर्जतच्या रक्षा सामाजिक विकास मंडळचे अध्यक्ष व गिर्यारोहक प्रशिक्षक अमित गुरव यांच्या नेतृत्वाखाली पाचजणांचे पथक रविवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाले. गुरव हे काश्मीरमधील लेह, लदाख गिर्यारोहणाच्या मोहिमेत होते. त्या ठिकाणी त्यांना कोल्हापूर, सांगलीच्या बातम्या पाहायला मिळत होत्या. मन अस्वस्थ होत होते, ते स्वत: आपत्ती व्यवस्थापनाचेही प्रशिक्षक असल्याने त्यांच्यातील मदतकार्यातील जवान त्यांना स्वस्थ बसू देईना. ते तीन दिवसांपूर्वी कर्जतला आले.
तब्येत बिघडल्याने त्यांनी थोडा आराम केला. ‘रक्षा’ या आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या संस्थेतील आपल्या सहकाऱ्यांसमवेत रविवारी रात्री थेट कोल्हापूर गाठले. येताना त्यांनी चादर, कपडे, साड्या, पाणी असे साहित्य भरलेले कर्जत नगरपालिकेचे तीन ट्रक व तहसीलदार कार्यालयाचे दोन ट्रक आणले.
कोल्हापुरात आल्यानंतर हे ट्रक जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देऊन ते शिरोळकडे रवाना करण्यात आले. त्यांच्यासमोर शिरोळ येथे जाऊन प्रत्यक्ष बचावकार्यात सहभाग घ्यायचा का? येथे थांबून अन्य काही मदतकार्य करायचे ? या विचारात असलेल्या या पथकाला प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात काम करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार गुरव यांच्या नेतृत्वाखालील तुषार वैद्य, योगेश परदेशी, सुमित गुरव, संकेत कडू या स्वयंसेवकांनी रविवारी रात्रीपासून पोलिसांसोबत या कामाला सुरुवात केली.
वाहतूक पूर्ववत सुरळीत होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर न सोडण्याचा निर्धार करत, झपाटून काम केले. शिरोलीपासून तावडे हॉटेलपर्यंत ठिकठिकाणी थांबून वाहनधारकांना योग्य त्या सूचना देऊन वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत राहील, याची दक्षता घेतली. पोलिसांसोबत राहून त्यांना हातभार लावण्याचे काम त्यांनी केले. निव्वळ महापुरात सापडलेल्या कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी इतक्या लांबून धावून आलेल्या स्वयंसेवकांच्या कार्याला पोलिसांनीही दाद दिली.
कोल्हापुरातील हॅम रेडिओचे नितीन ऐनापुरे यांच्याशी परिचय असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून महापुराच्या परिस्थितीची माहिती घेतली. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करून मदतकार्याला सुरुवात केली.- अमित गुरव, रक्षा सामाजिक विकास मंडळ, कर्जत (जि. रायगड)