ठळक मुद्देआधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावरशिवशाहीतील वारसा लोकशाहीतही जपला
बेळगाव : आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं...अशी घोषणा करणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा वारसा आजही वेगवगळ्या पध्दतीने लोक अंमलात आणतात. त्यांचाच कित्ता गिरवत बेळगावातील एका रणरागिनीने आधी मतदान केले आणि त्यानंतरच बोहल्यावर चढून शिवशाहीतील हा वारसा लोकशाहीतही जपला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. आधी पोटोबा, मग विठोबा या म्हणीनुसार चालणाऱ्या समाजात बेळगावातील एका जोडप्याने शनिवारी सकाळी आधी मतदान केले, त्यानंतरच विवाहस्थळी रवाना झाले.
प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहाचा क्षण खूप महत्वाचा असतो, विवाह समारंभ पूर्णपणे पार पडत नाही, तोपर्यंत या दिवशी नवरा-नवरी कुठंच जात नाहीत, मात्र लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे, हे सुशिक्षित मतदाराचे कर्तव्य लक्षात ठेऊन या जोडप्याने आधी मतदान केले, मगच बोहल्यावर चढले.
बेळगावातील कसाई गल्ली येथील संजिवनी ताशीलदार यांचा विवाह कोरे गल्लीतील यश हंडे यांच्याशी आज दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांनी त्यांचा विवाह होणार आहे. तत्पूर्वी या दोन्ही वधू-वरांनी सकाळी वरातीत सामील होण्याआधी बेळगावात मतदान केलं, त्यानंतर विवाहस्थळाकडे प्रस्थान केले. यश हंडे याने गोवा वेस येथील २५ नंबर मराठी शाळेत तर संजिवनी हिने टेंगीन करा गल्ली येथील उर्दू शाळेत मतदान केले. या दोघांचे कौतुक होत आहे.