समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांचा जीव गुंतला,’ अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते कर्नाटकामध्ये प्रत्यक्ष प्रचारात उतरले आहेत; तर दुसरीकडे जिल्ह्यातील पंधरा हजारांहून अधिक बांधकाम क्षेत्रातील मजूर, कंत्राटदार मंडळी गावाकडे मतदानासाठी रवाना झाले आहेत.
‘मध्यवर्ती’चा पहिला उमेदवारही कोल्हापुरातूनच जाहीर झाला होता.कोल्हापूर आणि कर्नाटकातील सीमाभागाचा जवळचा संबंध आहे. कोल्हापूरने सीमाप्रश्नामध्येही नेहमीच आक्रमक आणि लढाऊ भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांनीही आपापल्या कोल्हापूरच्या नेत्यांकडे कर्नाटकातील प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
राष्ट्रीय कॉँग्रेसने आमदार सतेज पाटील यांच्याकडे सीमाभागातील आठ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली होती. विविध ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आहेत. भाजपने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि भाजपचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखालील एक पथक सीमाभागात कार्यरत होते.
शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन मध्यवर्ती एकीकरण समितीच्या उमेदवारांना कोल्हापुरातून पाठिंबा व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यापासून ते प्रा. मधुकर पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी ‘मध्यवर्ती’च्या उमेदवारांसाठी बेळगाव आणि परिसरात सभा घेतल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शासकीय खात्यांमध्ये मूळचे बेळगावचे अनेकजण असून ते कोल्हापुरात स्थायिक आहेत.कोल्हापुरातील बांधकामे ठप्पकोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश बांधकामांवर कर्नाटकातील कामगार आहेत. कर्नाटकातील सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक कामगार कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असून, या निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपूर्वीच ही सर्व मंडळी आपापल्या गावांकडे रवाना झाली आहेत. ही मंडळी मतदान करून चार दिवस गावाकडे राहून येणार असल्याने बांधकामाची अनेक कामे ठप्प झाली आहेत.
निंबाळकर यांच्यासाठीही टीम खानापुरातकर्नाटकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांच्या पत्नी अंजली या खानापुरातून राष्ट्रीय कॉँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील मित्रांनी अंजली यांच्यासाठी खानापूर मतदारसंघात तळ ठोकला आहे.अंबाबाईचा आधारबेळगाव ग्रामीण मतदारसंघामधील महिला मतदारांनी बुधवारी (दि. ९) आणि गुरुवारी अंबाबाई दर्शनाची संधी या निमित्ताने साधली आहे. या दोन दिवसांमध्ये सुमारे दोन हजार महिलांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. काहींनी जोतिबाचेही दर्शन घेतले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या मैदानावर गुरुवारी ५० हून अधिक गाड्या लावण्यात आल्या होत्या. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी या महिलांचे अंबाबाई दर्शन झाल्यावर, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून त्यांना गाडीत बसताना नारळ, पेढे आणि हळदी-कुंकू असा प्रसादही दिला.