दत्तवाड : कर्नाटकातील सीमाभागात असणाऱ्या कृष्णा व दुधगंगा नदीकाठावरील गावात ९ ते १५ जुलै दरम्यान अतिवृष्टी होणार आहे. परिणामी महापूर येण्याची शक्यता असल्याची सूचना कर्नाटक शासनाकडून नागरिकांना देण्यात येत आहे. त्यामुळे लगतच्या महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरोळ तालुक्यात पाऊस कमी होत असला तरी वारणा, कृष्णा, पंचगंगा व दुधगंगा या चार नद्यांमुळे महापुराचा धोका दर पावसाळ्याला येथील नागरिकांना असतो. २०१९ ला महाप्रलयंकारी महापूर आला होता. मात्र २०२० ला अलमट्टी धरण येथून पाण्याचे नियोजन झाल्याने महापुराचा धोका टळला होता. सध्या जुलै महिना असून महापुराचा धोका कायम आहे. पण राज्यातील काही मंत्र्यांनी कर्नाटक शासनातील काही मंत्री गटाबरोबर चर्चा करून कृष्णा खोऱ्यातून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन याबरोबरच महापुरात अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करून महापूर येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. पण कर्नाटक शासनाच्या भरवशावर महाराष्ट्रातील मंत्री याबद्दल बोलत आहेत, त्या कर्नाटक राज्याने आपल्या राज्यात ९ ते १५ जुलै दरम्यान अतिवृष्टी होऊन महापूर येणार असल्याची माहिती कृष्णा नदीकाठावरील गावातील नागरिकांना देत आहेत. कर्नाटकात महापूर येणार म्हटल्यावर त्याचा फटका महाराष्ट्राला बसणार. शिरोळ तालुक्याला सर्वात जास्त महापुराचा फटका होणार. यामुळे येथील शेतकरी भीतीच्या छायेत आहेत.