- दत्तात्रय पाटील
म्हाकवे/कोल्हापूर- कोरोनाच्या पाश्वभुमीवर कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांकडून नाकाबंदी केली आहे. मात्र,महाराष्ट्रातून येणारी अत्यावश्यक सेवेची वाहने, सेवेवर रुजू होण्यासाठी जाणारे डॉक्टर, औषध विक्रेते यांचीही अडवणूक केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांत याबाबत संतापाची लाट उसळली असून याचे पडसाद म्हाकवे(ता.कागल)सीमारेषेवर उमटत आहेत.येथे कर्नाटकातील एकाही नागरिकाला आत येवू दिले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा ज्वोर बाजूलाच राहिला असून महाराष्ट्र-कर्नाटक असा नवाच वाद निर्माण झाला आहे. यामध्ये सीमावासीयांची कोंडी होत आहे.
म्हाकवे परिसरातील नागरिकांना कागलकडे जाण्यासाठी आप्पाचीवाडी मार्गे कोगनोळी टोलनाक्यावरून जावे लागते.मात्र,आज म्हाकवेतून गडमुडशिंगीकडे जाणारे औषध विक्रेते अभिजित पाटील, मुरगुड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, तसेच सेक्युरिटी साठी जाणारे कर्मचारी यांना कोगनोळीतून परतून लावले.त्यांनी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेले पुरावे, ओळखपत्रे दाखविली तरीही कर्नाटक पोलिसांनी आडमुठेपणा सोडला नाही.त्यामुळे संतप्त म्हाकवे ग्रामस्थांनी सीमाभागातील भाटनांगनूर, हदनाळ, आप्पाचीवाडी,कुर्ली येथिल वाहनधारकांची अडवूक केली. ही गावे औषध, किराणा मालासाठी म्हाकवे गावावरच विसंबून आहेत.हा वाद वाढण्यापुर्वी प्रशासनाने समझोता करणे आवश्यक आहे.
किती हा आडमुठेपणा....
कोगनोळीतील अडवणूकीच्या कारणावरून म्हाकवेत किराणा,औषधे नेण्यासाठी आलेल्या भाटनांगनूर(ता.चिक्कोडी) येथिल नागरिकांना अडविले. यावेळी या नागरिकांनी निपाणी पोलिसांना फोन केला. मात्र,निपाणी पोलिसांनी तुम्ही महाराष्ट्रात जावू नका असा सल्ला दिला.मात्र,या नागरिकांना म्हाकवे हे एक किमी वरील सोयीचे ठिकाण सोडून निपाणीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि संचारबंदीमुळे बिचारे हे नागरिक तिकडे जावू शकत नाहीत.त्यामुळे दोन राज्याच्या वादात सीमाभागातील सामान्य नागरिक भरडला जाणार आहे. "कर्नाटकात आपल्या नागरिकांची अशी अडवणूक होत असेल तर नाईलाजाने आम्हालाही त्यांची अडवणूक करावी लागेल. याबाबत आज(सोमवारी) कर्नाटक प्रशासनाशी आपण चर्चा करणार असून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. दत्तात्रय नाळ, पोलिस निरीक्षक,कागल