कोल्हापूर : पुण्यात काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एक लाख साडी वाटपाचे पडसाद रविवारी कोल्हापुरात उमटले. येथील शाहू सेनेतर्फे भवानी मंडपातील मोतीबाग तालमीसमोर पैलवानांना लंगोट वाटून साडी वाटपाचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन करू नये यासाठी पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांकडून दबाव आला, परंतु आम्ही तो झुगारल्याचा आरोप शाहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.विधानसभा निवडणुकीत कोथरुड (जि. पुणे) मतदारसंघातून मंत्री चंद्रकांत पाटील हे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील एक लाख महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्याचा राज्यभरातून निषेध होऊ लागला. कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटले.
चार दिवसांपूर्वी शाहू सेनेचे बाजीराव साळोखे, पै. बाबा महाडिक व सहकाऱ्यांनी या साडी वाटपाच्या निषेधार्थ मोतीबाग तालीम व गंगावेश तालीम येथे लंगोट वाटपाचे आंदोलन करत असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाजीराव साळोखे यांच्यासह भिकशेठ रोकडे, आनंदा पाटील, संकेत साळोखे, धैर्यशील साळोखे, ऋतुराज पाटील, सिद्धेश डवरी, करण यादव हे भवानी मंडपातील मोतीबाग तालीम येथे आले.
या ठिकाणी लंगोट वाटप करणार असल्याचे सांगितल्यावर पैलवानांनी नकार दर्शविला. त्यानंतर बाजीराव साळोखे यांनी मोबाईलवरून तालमीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आम्ही राजकारण करत नसून पैलवानांना फक्त लंगोट वाटण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.
यावर संबंधित पदाधिकाऱ्याने तालमीमध्ये लंगोट वाटप करू नयेत असे सांगण्यात आल्याचे सांगितले. त्यावर तालमीत राहू दे, पैलवानांना बाहेर पाठवा, त्यांना आम्ही लंगोट देतो. यानंतर काही पैलवान बाहेर आले.
यावेळी त्यांना साळोखे व सहकाऱ्यांनी लंगोट वाटप करून पुण्यातील साडी वाटपाचा निषेध केला. तसेच लंगोट वाटपाचे आंदोलन करू नये यासाठी पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आम्ही त्याला जुमानले नसल्याचा आरोप शाहू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेषातील पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते.
बाबा महाडिक गायबसाडी वाटपाचा निषेध म्हणून पैलवानांना लंगोट वाटपाचे आंदोलन उभारणारे पै. बाबा महाडिकच रविवारी गायब होते. त्यांनी अचानक यु टर्न का घेतला? याबाबत उलट सुलट चर्चा रंगली.गंगावेश तालीमने केला विरोधलंगोट वाटपाचे आंदोलन मोतीबाग तालीम व गंगावेश तालीम येथे करण्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु दोन दिवसांपूर्वी गंगावेश तालमीच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे रविवारी शाहू सेनेचे पदाधिकारी गंगावेश तालमीकडे फिरकले नाहीत.
पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून वाटप करण्यात आलेल्या साडी वाटपाचा निषेध म्हणून पैलवानांना लंगोट वाटप करण्यात आले आहेत. याचे दुसरे कारण म्हणजे निवडणुकीत निघालेला तेल लावलेल्या पैलवानाचा विषय. सरकारकडून पैलवानांच्या आरोग्य, खुराकासह इतर सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. खासबाग मैदानात पूर्वी दर शनिवारी होणाºया कुस्त्या आता होत नाहीत. त्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.- बाजीराव साळोखे,संस्थापक सदस्य, शाहू सेना
लंगोट वाटपामध्ये आमची कोणतीही राजकीय भूमिका नव्हती; परंतु पालकमंत्री पाटील यांनी बगलबच्च्यांच्या माध्यमातून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्याला न जुमानता पैलवानांना लंगोटे वाटून साडी वाटपाचा निषेध केला.- धैर्यशील साळोखे, सदस्य, शाहू सेना
पत्नी व सून रुग्णालयात दाखल असल्याने तसेच मुलगा बाहेरगावी गेल्याने अशा परिस्थितीत मी लंगोट वाटप आंदोलनाला उपस्थित राहू शकलो नाही. तरीही माझ्या इतर सहकाऱ्यांनी कोणताही दबाव न घेता आंदोलन पूर्ण केले.- पै. बाबा महाडिक, पदाधिकारी, शाहू सेना