कोल्हापूर : हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटाप्रकरणी कर्नाटक रेल्वे पोलीसांच्या विशेष पथकाने बुधवारी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडे चौकशी केली. कोल्हापूर पोलीसांचे पथक हुबळीमध्ये तळ ठोकून आहे. त्याठिकाणाहून माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आमदार आबिटकर यांच्या नावाचा उल्लेख स्फोटावरील बकेटवर कसा आला, यामागे कोणाचा हात आहे, याचा लवकरच छडा लावला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी दिली.
हुबळी स्फोटाची व्याप्ती मोठी असून महाराष्ट्र-कर्नाटकचे पोलीस कसून तपास करीत आहेत. आमदार आबिटकर यांचे कन्नड, तमिळी आणि इंग्रजी भाषांत नामोल्लेख आढळल्याने स्फोटाचे कनेकशन कोल्हापूरपर्यंत पोहचल्याची शकयता पोलीसांनी वर्तविली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी मंगळवारी आबिटकर यांच्याकडे चौकशी केली आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटकच्या रेल्वे पोलीसांच्या पथकाने बुधवारी गारगोटी येथे आबिटकर यांची घरी भेट घेतली. त्यांचेकडे या स्फोटासंबधी चौकशी केली. कर्नाटकाशी आपले काही कनेकशन आहे काय यासंबधीही माहिती घेतली. निवडणुकीच्या कालावधीत आबिटकर यांचा नामोल्लेख स्फोटकांच्या बकेटवर कसा आला, त्या यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हापूर आणि कर्नाटक पोलीस संयुक्त तपास करीत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.