कोपार्डे : महाराष्ट्र राज्यातील एसटी बसना कर्नाटक हद्दीत प्रवेश नाही, पण कर्नाटकच्या एसटीकडून महाराष्ट्र हद्दीत घुसखोरी करून लाखो रूपयांच्या उत्पन्नावर डल्ला मारला जात आहे. असा प्रकार होत असताना महाराष्ट्र सरकार गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांतही संताप व्यक्त होत आहे.
सीमाभागात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग हे सहा तर कर्नाटकचे बेळगाव,विजापूर कलबुर्गी आणि बिदर असे चार जिल्हे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र परिवहन (एसटी)मध्ये प्रवासी वाहतूक करण्याचे करार झाले आहेत. यामुळे कर्नाटक परिवहनच्या बसेस महाराष्ट्रात येताना व महाराष्ट्रातील कर्नाटक मध्ये प्रवासी वाहतूक करताना १८ किमी पर्यंत प्रवासी वाहतूक परवाना सवलत आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे कारण पुढे करून कर्नाटक शासनाने महाराष्ट्र परिवहनच्या बसेसना राज्यात येण्यास मज्जाव केला जात आहे. पण कर्नाटक राज्यातील बसेस राजरोस महाराष्ट्रात सीमावर्ती जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करत आहेत. जर महाराष्ट्रातील बसेसना प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोरोनामुळे मज्जाव होत असेल तर कर्नाटक बसेस महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक करताना कर्नाटक मध्ये कोरोनाचा प्रसार होणार नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे.
चौकट १)परवाना एका बसचा फेऱ्या मात्र चार बसेसच्या -- कर्नाटक परिवहनच्या बसेस महाराष्ट्रात बस थांब्याच्या बाहेर थांबून प्रवासी वाहतूक करत आहेत. मात्र या बसेसनी घ्यावा लागणारा परवाना घेतला आहे की नाही हे पाहण्याचे काम वाहतूक शाखेचे अधिकारी करत नसल्याने प्रवासी वाहतूक करून महाराष्ट्राच्या उत्पन्नावर डल्ला मारला जात असल्याचे एका कर्मचाऱ्याने आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.
२)उत्पन्नाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारही एसटी वर अन्याय करत आहे. महाराष्ट्रात प्रवासी कर १७ टक्के तर कर्नाटकमध्ये हाच प्रवास कर केवळ ७ टक्के आकारला जातो. याचा परिणामही एसटीच्या उत्पन्नावर होत आहे.