प्रकाश बेळगोजीबेळगाव : येथील सुवर्णसौध विधानसभेत आज सोमवार (दि.१९) पासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून काम आटोपते घेण्यात आले. त्याचबरोबर आजच्या पहिल्या दिवशी सभागृहात बसवेश्वर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य तैलचित्राचे मुख्यमंत्री आणि सभापतींच्या हस्ते अनावरण करण्यात आले.विधानसभेत सभापती विश्वेश्वर कागेरी हेगडे यांनी नुकतेच निधन झालेल्या विधानसभेचे उपसभापती आनंद मामणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव, माजी खासदार अब्दुल समद सिद्धकी, कोल्लूर बसनगौडा, माजी मंत्री जब्बारखान होन्नळी, सुधीन्द्रराव कसबे, माजी आमदार एन टी बोमण्णा, श्रीशैलप्पा बिदरुर, शंकरगौडा एन. पाटील, कुंबळे सुंदरराव आदी दिवंगतांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली प्रस्ताव मांडला.यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री व आमदार बी.एस.येडियुरप्पा, बंड्याप्पा काशीमपूर, माजी मंत्री यु.टी. खादर, एच के पाटील,सोमशेखर रेड्डी, मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिवंगत नेत्यांच्या कार्याला उजाळा देताना त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहात एक मिनिट स्तब्धता पाळून दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर आजचे कामकाज आटोपते घेण्यात आले.दरम्यान आज सभागृहात लावण्यात आलेल्या थोर पुरुषांच्या तैलचित्रातील सावरकरांच्या तैलचित्राला काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप व्यक्त केला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहाबाहेर सुवर्णसौधच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलनही केले. उपस्थित काँग्रेसच्या आमदारांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली.
त्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्या मंगळवारी सावरकरांच्या प्रतिमेवरून काँग्रेस पक्षाच्या वतीने सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उद्या शेतकरी तसेच मराठा आरक्षणासंदर्भातही धरणे आंदोलन होत असल्यामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस महत्त्वाच्या विषयांवरून गाजण्याची दाट शक्यता आहे.