कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात सातव्या माळेला (मंगळवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रत्यंगिरा देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी अष्टमी असल्याने रात्री साडेनऊवाजता देवीची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा व त्यानंतर जागर होईल.देवी उपासनेचा वार असल्याने मंगळवारी पहाटेपासूनच श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारच्या आरतीनंतर देवीची प्रत्यंगिरा रुपात पूजा बांधण्यात आली. शरभेश्वर शिवाची शक्ती असलेली ही देवी नारसिंही,अथर्वा, भद्रकाली या नावांनी ओळखली जाते.
अंगिरस म्हणजे काळ््या विद्येचे निराकरण करणारी म्हणून ती प्रत्यंगिरी. सिंहमुखी, सिंहावर आरुढ, त्रिशुल-डमरू-नाग आणि कपाल अथवा पानपात्र आणि गळ््यात लिंबांची माळ धारण करणारी, साक्षात अग्निस्वरुपा असे तिचे वर्णन आहे. शिवपुराणानुसार हिरण्यकश्यपाचे रक्त पिऊन उन्मत्त झालेल्या नरसिंह-विष्णूला शांत करणारी सिंहमुखी शरभेश्वर शिवाचा अवतार झाला.
शरभेश्वराला त्रास देण्यासाठी नरसिंहाने गंडभेरुंड आणि शरभशिवाला शांत करण्यासाठी पराशक्तीला नारसिंहीका प्रत्यंगिरा स्वरुप धारण करावे लागले आणि युद्धामध्ये समेट घडवून आणावा लागला. असा या प्रत्यंगिरा रुपाचा अन्वयार्थ आहे. ही पूजा सारंग मुनिश्वर, स्वानंद मुनिश्वर, माधव मुनिश्वर यांनी बांधली.दरम्यान बुधवारी अष्टमीचा जागर असल्याने रोजच्या पालखीऐवजी रात्री साडेनऊ वाजता श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनातून भाविकांच्या भेटीसाठी नगरप्रदक्षिणेला निघेल. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर रात्री बारानंतर महाकाली मंदिरासमोर देवीचा जागर होईल. गुरुवारी सकाळी साडे आठ नंतर मंदिर दर्शनासाठी खूले होईल.