कसबा बावडा : ‘करवीर’ पंचायत समितीच्या मासिक सभेत अवघ्या दोन मिनिटांत तब्बल १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. हा अती जलद विषयांना मंजुरी देणारा पायंडा पचनी न पडल्याने विरोधी गटाच्या सदस्यांनी चहापानावर बहिष्कार टाकत आपला संताप व्यक्त केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सुवर्णा बोटे होत्या. करवीर पंचायत समितीची सभा नेहमी दोन वाजता सुरू होते. विविध विषयांवर खडाजंगी चर्चा होऊन ही सभा सायंकाळी पाच वाजता संपते, परंतु बुधवारची सभा मात्र याला अपवाद ठरली. सभा सुरू झाली आणि काही दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. लगेचच काही अभिनंदनाचे ठराव झाले. विषय पत्रिकेवरील विषयांना वाचण्यास सुरुवात झाली आणि लगेचच सर्व विषय मंजूर मंजूर म्हणून मान्यता देण्यात आली. चर्चा न होताच विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर कसे झाले, असा सवाल तानाजी आंग्रे यांनी केला. आता सर्व विषय तुम्ही जर मंजूर केले असतील, तर आयत्या विषयावर तरी चर्चा करा, अशी मागणीही आंग्रे यांनी केली. मात्र, आता सर्व विषय मंजूर झाले आहेत, आता कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, असा पवित्रा सचिन पाटील यांनी घेतला. तसेच त्यांनी उपसभापती दत्तात्रय मुळीक यांना आभार मानायच्या सूचना केल्या. मुळीक यांनीही आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करून टाकले. चर्चा रंगली : सभा लगेचच का संपली ? ४सभा संपल्याचे जाहीर होताच नाष्टा आणि चहापानाचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, तानाजी आंग्रे, राजेंद्र सूर्यवंशी, सरदार मिसाळ, जयसिंग काशीद यांनी चहापानावर बहिष्कार टाकत गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांना धारेवर धरत, आमच्या प्रश्नांची उत्तरे आता तुम्ही तुमच्या केबीनमध्ये आम्हाला द्या, असे म्हणत तगादा लावला. ४काही वेळाने गटविकास अधिकाऱ्यांनी आंग्रे, मिसाळ, काशीद, राजेंद्र सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. ४बुधवारची सभा लगेचच कशी काय संपली याची चर्चा मात्र अधिकारी आणि कर्मचारी वर्गात बराच वेळ रंगली, परंतु शेवटी कोणालाच सभा लगेचच का संपली याचे उत्तर कळाले नाही. करवीर पंचायत समितीचे कामकाज उत्कृष्ट आणि समाधानकारक आहे. विषय पत्रिकेवरील कोणत्याही विषयात त्रुटी नसल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले आहेत. - सुवर्णा बोटे, सभापती, करवीर पंचायत समिती
करवीर पंचायतमध्ये दोन मिनिटांत १४ विषय मंजूर
By admin | Published: January 14, 2016 12:59 AM