कोल्हापूर : पोक्सो कायद्यांतर्गत अटकेतील संशयित आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने करवीर पोलीस ठाण्यात खळबळ माजली. त्याला तपासासाठी पुणे येथे घेऊन गेलेल्या पाच पोलिसांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. तसेच त्याला पोलीस कोठडीत ठेवल्याने करवीर व गांधीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी औषध फवारणी केली.
करवीर पोलिसांनी बुधवारी पोक्सो कायद्यांतर्गत एकास अटक केली होती. त्याला पुणे येथे तपासासाठी नेले. त्यानंतर त्याला गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवले. त्याची प्रकृती बिघडल्याने कोरोना चाचणी घेतली. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीसही हादरले. त्याच्या संपर्कातील करवीरच्या पाच पोलिसांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी घेतली. सुदैवाने सर्वांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांचे जीव भांड्यात पडले, पण पाचही पोलिसांना दहा दिवसांचे क्वारंटाईन केले.
दरम्यान, त्या संशयिताला गांधीनगरच्या पोलीस कोठडीत ठेवल्याने गांधीनगर पोलीस ठाणे व करवीर पोलीस ठाण्यात सायंकाळी औषध फवारणी केली.