विश्वास पाटील कोल्हापूर : एखाद्या संस्थेत ठेवीच्या रक्कमेवर डल्ला मारला जातो. परंतु करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक पांडुरंग आण्णाप्पा परीट (रा.कुरुकली ता.करवीर) याने संस्थेतील कर्जावरही डल्ला मारल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. २ कोटी ५५ लाख ७ हजार ३६८ रक्कमेचा अपहार या रक्कमेत झाला आहे.कर्ज रजिस्टरला नोंद नसताना यादीस जादा बोगस नावे घालून ही कर्जे उचलली आहेत. ठेवी, कर्जे यामध्ये राजरोस गैरव्यवहार सुरू असताना अध्यक्षांसह संचालक मंडळ, मानद सचिव, लेखापरीक्षक मात्र डोळ्यांवर जाड कातडे पांघरून बसले होते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. हा अपहार एकट्या व्यवस्थापक परीट आणि त्यांच्या कुटुंबीयांनीच केला असल्याचे कागदोपत्री दाखविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असल्याचे दिसत आहे.व्यवस्थापक परीट यांने एखाद्याने ठेव ठेवल्यास त्याला तेवढ्या रक्कमेची ठेव पावती दिली. पुन्हा तशीच ठेव पावती तयार करून त्याआधारे त्या रक्कमेच्या ८० टक्के कर्ज उचलायचे आणि पुन्हा दोन-चार महिने झाल्यावर आपण केलेली ठेव पावती मोडून पुन्हा पैसे उचलायचे, असा व्यवहार झाला आहे. कर्ज रजिस्टरप्रमाणे यादीस जादा नावे रक्कम दाखवून एकूण ४५ कर्जदारांच्या कर्जापोटी ६७ लाख ३६ हजारांचा अपहार केला आहे. विजयकुमार विठ्ठल पोवार यांची रजिस्टरप्रमाणे कर्ज येणे रक्कम फक्त ५४५५ रुपये आहे. ३१ मार्च २०२४ अखेर यादीप्रमाणे त्यांच्याकडून कर्ज येणे रक्कम ३ लाख ५ हजार ३७५ रुपये दिसते. म्हणजे त्यांच्या कर्जात २ लाख ९९ हजार ९२० रुपयांचा अपहार झाला आहे. धनाजी रामा कांबळे - १० लाख ९ हजार २७०, युवराज बाळू पाटील - ४ लाख, जोती राजेंद्र पाटील २ लाख, मनिषा विवेक कोरडे- १ लाख ९७ हजार ५८० अशा रक्कमेचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. कर्ज रजिस्टरला नोंद नसताना बोगस कर्ज रकमा दाखवून १ कोटी २३ लाख २९ हजार ७६५ रुपयांचा अपहार झाला आहे. संस्थेच्या ३५ कर्जदारांच्या नावांवर हे कर्ज दाखविले आहे. मधुकर गोविंद पाटील ४ लाख ८० हजार, बळवंत शिवाजी कांबळे ४ लाख ७० हजार, अशोक केशव मुसळे ४ लाख ९२ हजार ४७०, भारती जगन्नाथ पोवार २ लाख ७० हजार अशा रकमा उचलल्या आहेत.
कोणत्या कर्जात किती रकमेचा झाला अपहार..
- नियमित कर्ज : कर्ज रजिस्टरप्रमाणे यादीस जादा नावे रक्कम : ६७ लाख ३६ हजार ७७०
- बोगस कर्ज रक्कमा : १ कोटी २३ लाख २९ हजार ७६५
- एकूण १ कोटी ९० लाख ६६ हजार ५३५
- कर्ज रजिस्टरप्रमाणे यादीस जादा नांवे रक्कम : ६७ लाख ३६ हजार ७७०
- कॉल ठेव तारण कर्ज : ५४ लाख २३ हजार २८५
- दामदुप्पट ठेव तारण कर्ज : २ लाख ९३ हजार २८
- आकस्मित कर्ज : ७ लाख २४ हजार ५२०
एम. ए. देसाई यांनी काय केले..?संस्थेचे मानद सचिव मत्कुम अब्दुल सत्तार देसाई (एम. ए. देसाई) हे करवीर पंचायत समितीत ग्रामपंचायत विभागात लिपिक होते. त्यानंतर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागातही त्यांनी काम केले. आर्थिक व्यवहारांची चांगली जाण असल्याने संस्थेने त्यांना स्थापनेपासूनच मानद सचिव केले. ते शासकीय सेवेत असल्याने थेट सचिवपद देणे शक्य नव्हते परंतु या कामासाठी पतसंस्था त्यांना दरमहा ५ हजार मानधन देत होती. आपण सारे नोकरदार असल्याने दैनंदिन व्यवहारांवर लक्ष ठेवता येत नाही म्हणून सर्वांच्यावतीने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी नीट सांभाळलेली नाही. त्यांनी संस्थेसह, संचालक मंडळ व ठेवीदारांचा केसाने गळा कापल्याची तक्रार ठेवीदार करत आहेत.