कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिराच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन तोफा बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ताब्यात मिळाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, रजिस्ट्रीवरील नोंदी ही शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे त्या सोपविण्यात आल्या. या तोफा व्यवस्थित उडतात का, याची चाचणी केल्यानंतर त्या वापरात आणल्या जाणार आहेत.
अंबाबाई व जोतिबा देवाच्या नित्य-नैमित्तिक धार्मिक विधींमध्ये तोफ उडविण्याची पद्धत आहे. पण अंबाबाई मंदिरात वापरात असलेली तोफ फार जुनी आहे व तिचा कायम वापर झाल्याने झीज होऊन तुकडे पडत आहेत. काही ठिकाणी ती फुटली आहे. जोतिबा मंदिरात उडवली जाणारी तोफ मोठी आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून देवस्थान समितीकडून नवीन तोफा कुठे मिळतात का, याचा शोध सुरू होता.
चौकशीदरम्यान रमणमळ्यातील महसूल खात्याच्या अखत्यारित असलेल्या जागेत दोन तोफा असल्याची माहिती मिळाली. त्यांची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. या दोन्ही विभागांच्या कागदोपत्री प्रक्रिया, परवानगी, रजिस्ट्रीवरील नोंद काढणे ही कार्यवाही करून अखेर बुधवारी या तोफा देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आल्या.
चाचणी अशी...पण या तोफा अपेक्षेप्रमाणे उडतात का, याची चाचणी घेतल्यावरच त्यांचा वापर सुरू केला जाणार आहे. तोफ उडविण्यासाठी त्यात २५ ते ५० ग्रॅमपर्यंतचा दारूगोेळा भरला जातो. तो भरल्यानंतर तोफ कशी उडते, त्याचा आवाज किती होतो, किती लांबीपर्यंत त्याच्या ज्वाळा व धूर बाहेर पडतो, त्याने नागरिकांना काही धोका नाही ना, या सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत.