राजाराम लोंढे - कोल्हापूर -‘गोकुळ’ दूध संघाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या करवीर तालुक्यावरच आगामी निवडणुकीचे भवितव्य ठरवणार आहे. तालुक्यात सर्वाधिक दुधाबरोबर ठरावाची संख्याही अधिक आहे. विरोधी पॅनेल करताना या तालुक्याचे बळ असल्याशिवाय नेते धाडस करत नाहीत, हे उघड सत्य असल्याने आगामी निवडणूक तुल्यबळ होणार की काटा लढत हे या तालुक्यातील नेत्यांच्या भूमिकेवरच राहणार आहे. तालुक्यातील ३२६२ ठरावांपैकी तब्बल ५८६ ठराव हे एकट्या करवीर मधील आहेत. त्यामुळे संघावर नेहमीच करवीरचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान संचालक मंडळात पाच संचालक तालुक्यातील आहेत. गेले निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील व सतेज पाटील यांनी एकत्रित पॅनेल बांधणी केली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस व शेकापने आव्हान निर्माण केले होते. आता समीकरणे बदलली आहेत. कॉँग्रेस विरोधात आमदार चंद्रदीप नरके, संपतराव पवार व राष्ट्रवादी कॉँग्रेस हे सक्रिय आहेत. त्यात विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पहिल्यांदाच ‘गोकुळ’ ची निवडणूक होत आहे. तालुक्यातील बहुतांशी भाग हा पी. एन. पाटील यांच्या मतदारसंघात येत असल्याने उमेदवारी निवडीत त्यांचा वरचष्मा राहणार हे निश्चित आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा एकमेव सदस्य आहे. येथे त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. सत्तारूढ गटाकडे इच्छुकांची मांदियाळी असून, गेली दोन वर्षे त्यांनी तयारी सुरू केली आहे. तालुक्याच्या पूर्वेकडे संस्थांची संख्या अवघी १३५ असल्याने या परिसरासाठी एकच संचालकपद मिळू शकते. येथून स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांच्यासह प्रतापसिंह पाटील-कावणेकर, बाळासाहेब पाटील (वडकशिवाले) इच्छुक आहेत. तर भटक्या विमुक्त गटातून अशोकराव खोत (हणबरवाडी) यांनीही तयारी केली आहे. उर्वरित चार संचालकपदे ‘भोगावती’ व ‘कुंभी’ परिसरात द्यावी लागणार आहेत. विद्यमान संचालक विश्वास पाटील, सुरेश पाटील, बाबासाहेब चौगले हे इच्छुक आहेत. विद्यमान संचालक निवासराव पाटील यांचे चिरंजीव उदय पाटील यांनीही तयारी केली आहे, पण करवीर मतदारसंघाचे राजकारण पाहता पी. एन. पाटील यांना कोपार्डे, वडणगे व शिये जिल्हा परिषद या कार्यक्षेत्रात एक संचालकपद द्यावे लागणार आहे. येथून माजी संचालक चंद्रकांत बोंद्रे, हंबीरराव वळके (निवगे दुमाला), बी. एच. पाटील (वडणगे), तुकाराम पाटील (खुपीरे), एस. के. पाटील (कोपार्डे) हे इच्छुक आहेत. सांगरूळ, सडोली खालसा व परिते जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यक्षेत्रात बाळासाहेब खाडे (सांगरूळ), प्रकाश पाटील-कोगेकर हे नवीन चेहरे इच्छुक आहेत. एकंदरीत पाहता किमान दोन चेहरे बदलणार हे निश्चित आहे. चंद्रदीप नरकेंची परीक्षाआमदार चंद्रदीप नरके यांना मानणाऱ्या गटाच्या दूध संस्थाही आहेत. पी. एन. पाटील यांना विरोध म्हणून वेगळी भूमिका घ्यायची झाल्यास आमदार नरके यांचे चुलते अरूण नरके हे सत्तारूढ पॅनेलमध्ये असणार आहेत; पण विधानसभा निवडणुकीत ‘गोकुळ’ ची यंत्रणा आमदार नरके यांच्या विरोधात काम करत होती, त्यामुळे नेमकी कोणती भूमिका घ्यायची, असा पेच नरके यांच्या समोर असू शकतो. यांनी केलेतालुक्याचे प्रतिनिधित्वयांनी केलेतालुक्याचे प्रतिनिधित्वसदाशिव आमतेसंपतराव आमतेविश्वासराव पाटीलचंद्रकांत बोंद्रेबाबासाहेब पाटील-भुयेकरसुरेश पाटीलनिवासराव पाटीलबाबासाहेब चौगलेबाजीराव पाटील-आरेकर
‘गोकुळ’च्या राजकारणाचा ‘करवीर’च केंद्रबिंदू
By admin | Published: January 06, 2015 11:56 PM