नगरसेवक शशांक बावचकर
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील ३२.७६ कोटींची फुगीर वाढ ही पालिकेला आणखीन आर्थिक संकटात टाकणारी आहे. त्यामुळे बेशिस्तपणाला लगाम घालणे आवश्यक असताना कार्यासन ११ विभागाकडून गैरकारभाराला पाठबळ दिले जात आहे, असा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. या निर्णयाविरोधात नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
नगरपालिकेच्या २६ फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात ३२.७६ कोटींचे उत्पन्नवाढीच्या बाजूला फुगीर दाखविण्यात आले आहे. हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याला ३०८ कलमानुसार स्थगिती मागितली होती. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनीही स्थगितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. परंतु तो फेटाळण्यात आल्याने जिल्हा कार्यासन ११ व पालिकेतील कारभारी यांच्या संगनमताने नगरपालिकेची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही असा निर्णय घेतला असल्याची टीका केली आहे.