पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीवरील पोर्ले-यवलुज बंधाऱ्याजवळ पाण्यात अज्ञाताने बेकरी साहित्य फेकल्याने ते पाण्यावर तरंगत आहे. गेले दोन दिवस हे साहित्य बंधाऱ्याच्या दरवाज्याला अडकून होते. त्यानंतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले असून, काही साहित्य पाण्यावर तरंगताना दिसत आहे. नदी प्रदूषणाविषयी कितीही प्रबोधन केले तरी नदीचे पाणी प्रदूषित करण्याचे प्रकार काही कमी होत नसल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
पोर्ले-यवलूज दरम्यानच्या बंधाऱ्याच्या पाण्यात अज्ञाताने विविध प्रकारच्या बेकरी साहित्याची अंदाजे चार ते पाच पोती पाण्यात फेकून दिली की ती वाहून आलीत, याबाबत संदिग्धता आहे. बंधाऱ्याच्या दरवाज्यात अडकून बेकरी पदार्थ त्याठिकाणी कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे तर काही पदार्थ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कासारी नदीत गावातील सांडपाणी, उद्योगातील सांडपाणी थेट मिसळत असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध कारणांमुळे नदी प्रदूषित झाल्याने परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.