कासारवाडी गावाला गेल्या एक महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसत असून, नागरिकांना कोरोनाच्या महामारीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यंदा तरी गावची पेयजल योजना पूर्ण होईल, असे वाटत होते; पण ही योजना वनीकरणाच्या नियमात अडकली असल्याने कासारवाडीकरांच्या नशिबी यंदाही पेयजलचे पाणी मिळणार नाही.
कासारवाडी गावची लोकसंख्या २२०० आहे. गावात आठ दिवसांतून एकदा नळाला पाणी येते. प्रत्येक कुटुंबाला अपुरे पाणी मिळते. त्यामुळे महिलांना धुणे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. गावाला वाघजाई विहिरीतून पाणी येते; पण ती विहीरच कोरडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शौचालय, जनावरे, धुणी भांडी यासाठी पाण्याची आवश्यकता अधिक आहे; मात्र यासाठीही पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोरोना काळात आधीच नागरिक बेजार झाले असताना पाणीटंचाईच्या समस्येने त्यात भरच घातली आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिक विकतचे पाणी घेत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी घेणे परवडत नसल्याने ते पाण्यासाठी दूरची भटकंती करत आहेत.
कोट : कासारवाडी गावाला तात्पुरती सोय म्हणून अंबप मनपाडळे योजनेतून लवकरच वारणेचे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. मनीषा माने, (जिल्हा परिषद सदस्य)
गावाला प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. वारणेचे पाणी ग्रामपंचायतीकडून विकत घेतले जाते. वारणेची पाणी पट्टी भरली असून, पाणी दोन दिवसांत येईल. शोभाताई खोत, सरपंच
फोटो : ०५ कासारवाडीत पाणीटंचाई
कासारवाडीत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी वणवण करताना महिला.
२) कोरोनाच्या महामारीत पाण्यासाठी वणवण करणारी वृद्ध महिला.