कोल्हापूर : काश्मिरातील दहशतग्रस्त भागातील निराधार, निराश्रितांना पुण्यातील ‘सरहद’ संस्था आधार देण्याचे काम करीत आहे. या संस्थेने ‘आश’ कार्यक्रमाद्वारे काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत पूरबाधित हस्तकलाकारांचे कोल्हापुरात प्रदर्शन राजारामपुरीतील आप्पाज कॉम्प्लेक्समध्ये प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनातील एक वस्तू खरेदी करून संबंधित कारागिरांसह पूरबाधितांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, बडगाम भागात पुराने जनजीवन विस्कळीत झाले. व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील जनतेवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकजण निराधार, निराश्रित झाले आहेत. त्यांच्या मदतीसाठी ‘सरहद’तर्फे काश्मीर येथील २५ हस्त कारागिरांच्या वस्तूंचे प्रदर्शन होत आहे. यात काश्मीर व लडाखमधील कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. या कारगिरांची मजुरी आणि वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा नफा हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. कोल्हापूरकर मदतीसाठी दिलदार आहेत. देशातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीवेळी कोल्हापुरातून मदत होतेच. त्यामुळे काश्मिरातील या पूरग्रस्तांनादेखील एक वस्तू खरेदी करून कोल्हापूरकरांनी मदतीचा हात द्यावा. प्रदर्शनामध्ये जामा स्टोल, साडी, ड्रेस मटेरियल, पशमीना शाल, काश्मिरी जॅकेट, कोट, कानिजामा, एम्ब्रॉयडरीज, साडी, लाखेचे दागिने, आदींचा समावेश आहे.प्रदर्शनातून वस्तू विक्री व मदतीचा उपक्रम ‘सरहद’ राबवीत आहे. कलाकुसर केलेल्या वस्तू या बाजारभावापेक्षा कमी किमतीत प्रदर्शनात उपलब्ध आहेत. २९ डिसेंबरपर्यंत सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.- फिदा हुसेन (समन्वयक, सरहद )
काश्मिरी शाल, जॅकेट आणि दागिनेही
By admin | Published: December 24, 2014 11:45 PM