कोल्हापूर : कोल्हापूरची कस्तुरी दीपक सावेकर एव्हरेस्ट मोहिमेसाठी ३१ मार्चला रवाना होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिली स्त्री गिर्यारोहिका असून तिची मोहीम यशस्विपणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा व राष्ट्रध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. ८) होणार आहे. कोल्हापूर-पन्हाळा रोड येथील गुरूकृपा सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी ५.३० वा. हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती अरविंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कुलकर्णी म्हणाले, करवीर हायकर्सच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी केली जाणार आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून विविध मोहिमांत सहभागी होते. आतापर्यंत तिने १३७ मोहिमांत सहभाग घेतला आहे. सध्या ती बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. आता तिने जगातील सर्वांत उंच असे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प केला आहे. ३१ मार्चला ती कोल्हापुरातून रवाना होणार आहे. रविवारी तिला राष्ट्रध्वज व भगवा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे.आपल्या मोहिमेबद्दल कस्तुरी म्हणाली, गेली वर्षभर या मोहिमेची तयारी मी करत आहे. पहाटे पाच वाजल्यापासून योगासन, ध्यानधारणा, पोहणे, दुपारी जिम व संध्याकाळी मैदानावर सराव करते. दर रविवारी पाठीवर २५ किलो बोजो घेऊन जोतिबाचा डोंगर तीनवेळा चढणे आणि उतरणे असा सराव करत आहे. माऊंट मेरा पीक ही बारा दिवसांची मोहीम आहे.मोहिमेसाठी ४२ लाख रुपये खर्च आहे. त्यासाठी करवीरवासीयांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कºहाड, जयसिंगपूर, गडहिंग्लज येथील दानशूर व विशेषत: शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधीदेखील मदत करत आहेत. ध्वजप्रदान सोहळ्यास गिरीप्रेमी संस्थेच्या ज्येष्ठ गिर्याहक व संस्थापक उषा पागे यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय मोरे, आनंदा डाकरे, दीपक सावेकर, संग्राम भोसले, विक्रम कुलकर्णी, इंद्रजित सावेकर, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.