विलास घोरपडे। संकेश्वर
वादग्रस्त सीडीप्रकरणी रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याजागी अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला ज्वोले व आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचीच सीमाभागात उत्सुकता आहे.
कर्नाटकात ‘काँग्रेस व निजद’ आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचून भाजपची सत्ता स्थापन्यात रमेश जारकीहोळी यांनी मोलाची भूमिका बजावली होती. भाजपचे सरकार येताच पालकमंत्रिपदी जगदीश शेट्टर यांची वर्णी लागली. परंतु, ते जिल्ह्याला कमी वेळ देत असल्याच्या तक्रारीमुळे तत्कालीन पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे बेळगाव पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील लिंगायतबांधवांची संख्या विचारात घेता कत्तींना पालकमंत्रिपद दिल्यास पोटनिवडणुकीत भाजपला मदत होईल, असा एक प्रवाह आहे.
कत्ती हे यापूर्वी आठवेळा आमदार, विविध खात्याचे मंत्री व बेळगावच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही पेलली आहे तसेच ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे.
लक्ष्मण सवदी यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद असल्याने पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे. महिला व बालकल्याण मंत्री शशिकला ज्वोले या नवख्या आहेत. त्यामुळे रमेश जारकीहोळी यांचे बंधू व आरभावीचे आमदार व कर्नाटक दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांना संधी दिली जाणार, अशीही चर्चा आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी कत्ती आणि जारकीहोळी यांच्यात रस्सीखेच होणार आहे.
-----------------------
* उमेश कत्ती : २२०३२०२१-गड-०५
* लक्ष्मण सवदी : २२०३२०२१-गड-०६
* भालचंद्र जारकीहोळी : २२०३२०२१-गड-०७
* शशीकला ज्वोले : २२०३२०२१-गड-०८