संदीप बावचे - जयसिंगपूर -नेमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांचा पूर येतो; मात्र प्रत्यक्षात प्रश्न तडीस लागत नाही. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे भिजत पडला आहे. कृष्णा नदीपलीकडील कवठेगुलंद येथे हे आरोग्य केंद्र होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खरी गरज आहे.कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम्, सुफलाम् बनला आहे. पावसाळ्यात दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने नृसिंहवाडी-औरवाड जुन्या पुलाला पर्यायी पूल बांधावा अशी मागणी जोर धरल्यानंतर व २००५-०६ ला महापूर येऊन गेल्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला. नदीपलीकडील औरवाडसह गौरवाड, बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी या सात गावांना नवीन पुलामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच शासकीय आरोग्य सुविधा मिळावी, कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. मध्यंतरीच्या काळात नृसिंहवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळून याठिकाणी इमारत उभारण्यात आली. मात्र, कवठेगुलंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे कागदावरच राहिला आहे. आरोग्य केंद्र मंजूर आहे; मात्र कार्यवाही होत नसल्याने हा प्रश्न ‘जैसे थै’ आहे. उपकेंद्रे असली तरी तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांअभावी रुग्णांना सुविधा मिळण्यास अडचणी ठरतात. यामुळे नदीपलीकडील नागरिकांना एकतर नृसिंहवाडी, कुरुंदवाड अथवा जयसिंगपूरकडे उपचारासाठी जावे लागते. पावसाळ्यात तर नाहक त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधींकडून कवठेगुलंद येथे आरोग्य केंद्र होण्याबाबत आश्वासनांचा पूरच आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. मात्र, हा प्रश्न अजूनही तडीस गेलेला नाही. आरोग्य केंद्र मंजूर असताना कार्यवाही का होत नाही, असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाला हा प्रश्न सोडविता आलेला नाही. राजकीय इच्छाशक्ती एकवटली तरच हा प्रश्न मिटेल व प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.पाठपुरावा करणारशिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना आपण पत्रव्यवहार केला आहे. कवठेगुलंदसह गणेशवाडी, आलास, शेडशाळ, गौरवाड येथील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.वरिष्ठांकडे अहवालकवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. वरिष्ठ पातळीकडे याबाबतचा अहवाल पाठविलेला आहे. कार्यवाही झाली नसल्यामुळे आरोग्य केंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कवठेगुलंदला प्रतीक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राची
By admin | Published: April 27, 2015 9:46 PM