कवठेएकंद : ग्रामदैवत श्री सिद्धराजाच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने देवस्थान ट्रस्टी, यात्रा समिती तसेच सर्व दारू शोभा मंडळांची कामे अखेरच्या टप्प्यात आली असून, विजयादशमीच्या उत्सवासाठी कवठेएकंद (ता. तासगाव) सज्ज होत आहे. यंदाच्या आतषबाजीच्या सोहळ्यासाठी प्रामुख्याने झुंबर औटांची आतषबाजी, रिमोटद्वारे रॉकेटचे उड्डाण, रावण दहन, सप्तरंगी झाडकाम अशा नावीन्यपूर्ण तसेच बुरुज, चक्रे अशा विविध प्रकारातून शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण होणार आहे.यंदा आतषबाजी सोहळ्याबाबत चोख नियोजनासाठी व मागील काही वर्षात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर दसऱ्यावर बंधने येणार का, असा प्रश्न होता. परंतु प्रशासनाने गावकऱ्यांना, सुरक्षित व जबाबदारीने उत्सव पार पाडावा, अशा सूचना केल्या. त्यामुळे उत्साहातील दाहकता कमी होऊन सुखकर शोभेचे दारूकाम करण्यावर सर्व मंडळांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता पूजा होऊन ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्यास हजारो औटांच्या सलामीने प्रारंभ होणार आहे.देवस्थान ट्रस्टी, यात्रा कमिटी, गुरव-पुजारी, डवरी-गोंधळी असे सर्व सेवेकरी, वरशिलदार, मानकरी यांनी पालखी सोहळ्यासाठी सज्जता केली आहे. श्री सिद्धराज विद्युत रोषणाई मंडळाने केलेल्या देवालयाच्या परिसरातील विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.पालखी सोहळ्याच्या मार्गावरील सर्व अडथळे काढून स्वच्छता, सफाई, रंगरंगोटी, सजावट करण्यात आली आहे. दारू शोभा मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात असून गोलंदाज मंडळींकडून दारूकामाच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. येथील नयनदीप मंडळ, सिद्धराज मंडळ, भगतसिंग मंडळाच्या डिजिटल औटांची बरसात, नवजवान मंडळ (ब्राह्मणपुरी)च्या झुंबर औटांची आतषबाजी, सिद्धिविनायकचे स्टार व्हील, तसेच बसवेश्वर मंडळाचे एन.एच.टी. रिमोटद्वारे रॉकेट आदी विशेष आकर्षण आहे. (वार्ताहर)दीडशे मंडळे सहभागीसर्व मंडळे, भाविकांकडून दारूकाम सुखकर बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दीडशेहून अधिक मंडळे सहभागी आहेत. पालखीचे वेळेत मार्गक्रमण करावे, यासाठी यात्रा समिती, ग्रामपंचायत, पोलीस ठाणे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामप्रदक्षिणेच्या वेळेचे मार्किंग, पाणीपुरवठा, आरोग्य कक्ष, पार्किंग सोय याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
विजयादशमीसाठी कवठेएकंद सज्ज
By admin | Published: October 21, 2015 11:15 PM