भालचंद्र नांद्रेकर -- दानोळी --कवठेसार (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या आवारात ५० हून अधिक वेडीवाकडी निलगिरीची झाडे असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर लागला आहे. तसेच काही झाडे वाळलेली असल्यामुळे ती कधीही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शाळेतील २५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन धोकादायक झाडे काढून टाकावीत, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या आवारात ३० ते ३५ वर्षांपूर्वीची निलगिरीची दाट झाडे मोठ्या प्रमाणात लावली होती. ही झाडे सध्या ६० फुटांहून अधिक उंचीची वाढल्याने वादळी वारा आल्यास ती कोलमडतात. तसेच पावसाळ्यात शाळेच्या आवारात पाणी साचल्याने झाडांची मुळे ठिसूळ होतात व वारे आल्यानंतर ती झाडे कोलमडून पडतात. असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. विद्यार्थी या निलगिरीच्या झाडाच्या परिसरात नेहमी खेळत असतात. मात्र, कोणतीही जीवितहानी होण्याअगोदर प्रशासनाने दखल घेणे गरजेचे होते. यासाठी कवठेसार ग्रामपंचायतीने या निलगिरीच्या झाडांबाबत परिक्षेत्र वनअधिकारी कोल्हापूर, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण, तहसील कार्यालय शिरोळ, गटविकास अधिकारी शिरोळ व शाळेला धोकादायक झाडे असल्याने ही झाडे हटवावीत, असे निवेदन दिले आहे. असा ठरावही ग्रामपंचायतीने केला होता. मात्र, शिरोळ तालुक्याच्या उत्तर दिशेला असलेले शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या कवठेसार गावात जाण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
कवठेसार शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
By admin | Published: August 19, 2016 11:41 PM