कोल्हापूर : एका लोकप्रिय वाहिनीवर सुरु असलेल्या गेम शो मध्ये सोमवारच्या एपिसोडमध्ये खास कोल्हापूरी पदार्थांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या शोचे सूत्र संचालन महानायक अमिताभ बच्चन करत आहेत.एका लोकप्रिय वाहिनीवर गेल्या महिन्यात कौन बनेगा करोडपती हा गेम शो सुरू आहे. महानायक अमिताभ बच्चन या शोचे सूत्र संचालक आहेत. मूळच्या नागपूर येथील स्वरूपा देशपांडे या १२ व्या पर्वमध्ये सोमवारी फास्टेट फास्ट फिंगर प्रश्न जिंकून हॉट सीट वर आल्या.या गेम मध्ये पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हे पदार्थ कोणत्या भागाचे प्रतिनिधित्व करतात असा प्रश्न विचारण्यात आला. मालवण, मेवाड, कोल्हापूर, कोकण असे पर्याय या प्रश्नाच्या उत्तरासाठी देण्यात आले होते.नवी मुंबई येथे नोकरी करणाऱ्या देशपांडे यांनी कोल्हापूर हा अचूक पर्याय सांगून रक्कम जिंकली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या जादुभऱ्या आवाजात कोल्हापूरच्या या विशेष खाद्यपदार्थ्याचे नाव घेतले.
मुळच्या नागपूरच्या स्वरूपा देशपांडे, पतीपासून वेगळ्या झाल्यानंतर नवी मुंबईत स्थायिक झाल्या आहेत. पूर्वी रिसेप्शनिस्टची नोकरी करणाऱ्या स्वरूपा आता नवी मुंबईच्या एका दुकानात स्टोर इंचार्ज म्हणून काम करतात. आई आणि दोन लेकींची जबाबदारी खांद्यावर असताना, मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
सुरुवातीस रेल्वे निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुभाष बिष्णोई यांना या खुर्चीत बसण्याचा बहुमान मिळाला होता. मात्र, चौथ्याच प्रश्नावर गडबडल्याने त्यांना रिकाम्या हातीच घरी परतावे लागले. यानंतर ‘फास्टेस्ट फिंगर’ फेरी जिंकत स्वरूपा ‘केबीसी’च्या ‘हॉटसीट’वर विराजमान झाल्या. खेळासाठी त्यांनी मनोरंजन विश्वासंदर्भातल्या प्रश्नांना पसंती दर्शवली.
मुलींच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप जाहीर
केबीसीत सहभागी होवून स्वरूपा जास्ती रक्कम जिंकू शकल्या नाहीत. ‘करसनभाई पटेल यांनी आपल्या मुलीच्या नावावर कोणता ब्रँड सुरू केला?’, या 3 लाख 20 हजाराच्या प्रश्नावर स्वरूपा अडखळल्या. या प्रश्नाचे उत्तर होते, ‘निरमा’. मात्र, त्यांनी या प्रश्नावर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ 1 लाख 60 हजार इतकी रक्कम त्यांनी जिंकली. मात्र, खेळ सोडताना त्यांना एक सुखद धक्का मिळाला. अमिताभ बच्चन यांनी ‘वेदांतु’ची 5 लाखांची स्कॉलरशिप स्वरूपा यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी जाहीर केली. या घोषणेनंतर स्वरूपा देशपांडेंना आनंद गगनात मावेनासा झाला होता.