राजाराम मैदानावर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पॅकर्स क्रिकेट क्लबने २० षटकांत ९ बाद १४५ धावा केल्या. यात आदित्य पिसाळने २३, कार्तिक पाटीलने १९, जुनैद मलबारीने १७, रोहन रेन्युगुंटवारने नाबाद १५ धावा केल्या. गोलंदाजी करताना पॅकर्स फौंडेशनकडून मंदार पाटीलने तीन, आयुष सक्सेना, संजय कदम, व संतोष राजगोळकरने प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना पॅकर्स फौेंडेशनला हे आव्हान पेलविले नाही. त्यांचा सर्व संघ १७.१ षटकांत ११५ धावांत गुंडाळला. यात शुभम मोहरकरने २९ व मंदार पाटीलने २८ धावांची खेळी करीत झुंज दिली. मात्र, ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाही. अन्य खेळाडूंमध्ये कुणाल डोंगळेने ११, पृथ्वीराज उन्हाळकरने १० धावा केल्या. पॅकर्स क्रिकेट क्लबकडून आदित्य पिसाळ व कार्तिक पाटील यांनी भेदक गोलंदाजी करीत प्रत्येकी तीन बळी घेतले. त्यास सूरज सरनाईक, प्रफुल्ल चव्हाण, रिजवान खान यांनी प्रत्येकी एक बळी घेत मोलाची साथ देत विजयावर शिक्कामोर्तब केला. विजयी संघास केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, स्पर्धा समिती अध्यक्ष जर्नादन यादव, सहसचिव कृष्णा धोत्रे, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो : २७०२२०२१-कोल-क्रिकेट
आेळी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या पॅकर्स क्रिकेट क्लब ‘ब’ संघास बाळ पाटणकर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.