कोल्हापूर : मुश्रीफसाहेब नमस्कार, मला ओळखलं का, आता बाजूला केलसा पुढच्या निवडणुकीत ओळख दाखविणार, आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, साहेब हे वागणं बरं नव्हं, अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोकराव पवार-पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा चिमटा काढला. जवळच्या कार्यकर्त्याला सोडून कोणाला जवळ केले, हे बरोबर नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातील मतदान वि. स. खांडेकर विद्यामंदिर झाले, यावेळी अशोकराव पवार, क्रांतीसिंह पवार, माजी आमदार चंद्रदीप नरके, रवींद्र मडके हे मतदारांना अभिवादन करीत असतानाच मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे मतदान केंद्राची पाहणी करून आले. एकमेकांना नमस्कार करीत पुढे चालत असताना अशोकराव पवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फटकेबाजी सुरू केली. हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहत, पवार म्हणाले, ‘साहेब नमस्कार मला ओळखलं का, आता तरी लक्षात ठेवा, पुढच्या निवडणुकीत तुम्ही ओळख दाखवणार. आधी भांडायचे आणि नंतर एकत्र यायचं, निष्ठावंत कार्यकर्त्याला साेडला आणि कोणाला तरी जवळ केला. अशोकराव पवार यांच्या सडेतोड बोलण्याची चर्चा मात्र मतदान केंद्रावर दिवसभर होती.‘पी. एन.’नी फोनही केला नाहीकरवीर विकास संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल करू नका म्हणून मुश्रीफसाहेब, बंटीसाहेब तुम्ही मला सांगितले. पी. एन. पाटील आणि आम्ही कट्टर विरोधक असताना तुमचे ऐकले. मात्र, पी. एन. पाटील यांचा एक फोनही आला नाही. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, मी घरी येऊन गेलो की. तुम्ही येऊन काय करायचे, असा प्रतिप्रश्न पवार यांनी केला.
Kdcc Bank Election : मुश्रीफसाहेब हे वागणं बरं नव्हं..!; अशोकराव पवारांच्या सडेतोड बोलण्याची जोरदार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 12:47 PM