कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज, राज्याचे गृह राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.बँकेचे अध्यक्ष, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कागल विकास संस्था गटातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गगनबाबडा तालुक्यातील एकूण ६६ ठरावधारकांपैकी ४९ ठरावधारक फेटे बांधून मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत उपस्थित होते. यामुळे बँक परिसरात मोठी गर्दी झाली होती.तर दूध व इतर संस्था गटातून भैय्या माने अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय महिला गटातून निवेदिता माने तसेच प्रक्रिया व खरेदी-विक्री संस्था गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय इतर गटांतूनही काही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उद्यापासून अर्ज दाखल करण्यास गर्दी होऊ शकते. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत ३ डिसेंबरपर्यंत असून, ५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बारा तालुक्यातील विकास संस्था गटातून बारा तर इतर गटातून नऊ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर ७ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
kdcc bank election : पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 1:21 PM