कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नंतर मुश्रीफ यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. सतेज पाटील यांची गगनबाबडा गटातून तर हसन मुश्रीफांची कागल सेवा संस्था गटातून बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेतील सत्तारुढ आघाडीतील दोन नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंत्री मुश्रीफ हे गेली पाच वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत.आज कागलमधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील चार उमेदवारांनी माघारी घेतल्याने त्यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली. कागलच्या शाहू साखर कारखान्याची निवड बिनविरोध झाल्याने राजे गटाच्या उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे मुश्रीफ यांचा मार्ग मोकळा झाला.जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र जागा वाटपावरुन यात तडजोड होत नसल्याने ही निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. आमदार विनय कोरे 'अनुसूचित' च्या जागेवर आग्रही आहेत. तर काँग्रेसचा याला नकार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे.
निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांनी मंत्री मुश्रीफ यांना बिनविरोध घोषित केले. यानंतर राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राजेश लाटकर, संभाजीराव भोकरे आदी मान्यवरांनी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला.