kdcc bank result : करवीरमध्ये दोन्ही माजी आमदारांना धक्का, काँग्रेसचे वर्चस्व वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 03:24 PM2022-01-07T15:24:58+5:302022-01-08T15:35:00+5:30
कोपार्डे : जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातून इतर मागास मधून शिवसेनेला व शेकापला इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद प्रतिनिधी ...
कोपार्डे : जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातून इतर मागास मधून शिवसेनेला व शेकापला इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद प्रतिनिधी गटातून संधी देण्यात आली. मात्र या दोन्ही उमेदवारांना पराभवला समोरे जावे लागले. भैय्या माने यांनी क्रांतीसिंह पाटील यांचा तर, विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांना पराभवाची धुळ चारली. या निकालानंतर मात्र करवीरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व वाढल्याचे दिसून आले.
शेकापचे माजी आमदार संपत पवार पाटील यांचे सुपुत्र क्रांतीसिंह पवार पाटील तर करवीर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मडके यांना विरोधी गटातून संधी देण्यात आली. हे दोन्ही उमेदवार राजकीय ताकद असणारे असल्याने शिवसेना, शेकापकडून विजयासाठी मोठे प्रयत्न झाले पण दोघांच्याही पराभवाने सेना, शेकापचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा आहे.
पी एन पाटील यांची जिल्हा बँकेला बिनविरोध निवड झाल्याने काँग्रेसचे पारंपारिक विरोधक शिवसेना व शेकापच्या गोटात राजकीय निराशा निर्माण झाली होती. पण जागा वाटपातून मतभेद झाले आणि अचानक संजय मंडलिक यांनी शिवसेना स्वबळावर विरोधी पँनेल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी रवींद्र मडके यांना इतर मागास प्रवर्गातून व संपत पवार पाटील यांचे सुपुत्र क्रांतीसिंह पाटील यांची उमेदवारी दिली गेली.
यामुळे शिवसेना व शेकापचा गट गोकुळ निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झाला. इतर मागास प्रवर्गातून माजी आमदार नरके यांचे समर्थक रवींद्र मडके यांना उमेदवारी दिली. त्यांच्या समोर सत्ताधारी गटातून विजयसिंह माने तर इतर संस्था गटातून क्रांतीसिंह पाटील यांच्या समोर भैय्या माने यांचे तगडे आव्हान होते. दोन्ही माजी आमदारांना या दोन उमेदवारांच्या विजयातून आपल्या राजकीय ताकदीला उभारी मिळणार होती.
पण विजयसिंह माने यांनी रवींद्र मडके यांचा १८८१ मतानी तर भैय्या माने यांनी क्रांतीसिंह पाटील यांचा ६१० असा मोठ्या फरकाने पराभव केल्याने सेना, शेकापचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे काँग्रेसला बळ तर सेना शेकापची पिछेहाट झाली आहे.