कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागरी बँका आणि पतसंस्था गटात प्रा. अर्जुन आबिटकर यांनी विजय मिळवला. बँकेचे विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे यांना पराभवाचा धक्का बसला. आबिटकर हे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे लहान बंधू आहेत.या गटात विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे, प्रा. अर्जुन आबिटकर अशी तिरंगी लढत झाली. १२२१ मतदारांपैकी आमदार प्रकाश आवाडे यांना ४६१ मते मिळाली. प्रा. अर्जुन आबिटकर याना ६१४ तर अनिल पाटील यांना १०६ मते मिळाली.
आवाडे यांना सत्तारुढ आघाडीत स्थान दिले होते. तर प्रा. आबिटकर हे विरोधी आघाडीतून लढत होते. आबिटकर जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनिल पाटील यांनी मागील निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी सत्तारुढ आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. पण भाजपच्या कोट्यातून आवाडे यांना उमेदवारी मिळाल्याने अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला. अर्जुन आबिटकर यांच्या उमेदवारीस मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसचा कडाडून विरोध होता.