कोल्हापूर : बँक एवढी चांगली चालवली होती, तर दगड धोंडे जरी उभे केले असते तर ते निवडून आले असते, पण तुम्ही भाजप आणि कोरेंना जवळ करुन काय मिळवले अशी मंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून वडगावमधील एका वाचकाने लोकमतला फोन करुन विचारणा केली. तुम्ही असेच सगळ्यांना गृहीत धरुन चालणार असाल तर लोक तुम्हालाही खड्यासारखे बाजूला करतील हे लक्षात ठेवा असा इशाराही दिला आहे.लोकमतने मतदानानंतर केलेले निवडणुकीचे विश्लेषण तंतोतंत खरे ठरल्याबद्दल अभिनंदन करतानाच त्यांनी नेत्यांच्या सोईस्कर भूमिकांचाही खरपूस भाषेत समाचार घेतला. विशेषता मुश्रीफ यांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी सुचनाही त्यांनी केली. दरवेळी सोईच्या भूमिका घेणे मतदारांनाही रुचत नाही, हे जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत मतदारांनी दाखवून दिले आहे.बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिल्यापासूनच निकराचे प्रयत्न केले. मात्र स्थानिक राजकारणातून एकमेकांच्या उमेदवारीला झालेला विरोध, त्यात इच्छूकांच्या मांदियाळीने निवडणूक लागली. शेवटच्या टप्यात खासदार संजय मंडलिक यांनी सवतासुभा मांडत निवडणुकीत चांगलाच रंग आणला. पतसंस्था, दूध संस्था, प्रक्रियासह राखीव गटा अशा नऊ जागांवर त्यानी तगडे आव्हान निर्माण केले.
Hasan Mushrif : 'साहेब,..तर लोक तुम्हालाही खड्यासारखे बाजूला करतील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 12:28 PM