अनिल पाटील सरुड : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये शाहूवाडीतुन संस्था गटातून रणवीर गायकवाड यांनी बँकेचे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील - पेरीडकर यांचा तब्बल ३३ मतांनी पराभव केला. गत निवडणुकीमध्ये झालेल्या मानसिंगराव गायकवाड यांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत निघाल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यात फोडाफोडी बरोबरच पाडापाडीचेही राजकारण झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणात यावेळी रणवीर गायकवाड यांनी बाजी मारली आहे. तर पाडापाडीच्या राजकारणाचा सर्जेराव पाटील - पेरीडकर यांना फटका बसल्याचे दिसून आले. रणवीर गायकवाड यांना ६६ मते मिळाली तर निसटत्या विजयाचा दावा करणाऱ्या सर्जेराव पाटील यांना केवळ ३३ मतावर समाधान मानावे लागले. माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांनी रणवीर गायकवाड यांच्या विजयासाठी केलेल्या परफेक्ट नियोजनामुळेच पेरीडकरांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. या विजयामुळे रणवीरसिंह गायकवाड यांनी जिल्ह्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. हा विजय मानसिंगराव गायकवाड यांच्या गटासह माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांच्या गटाला उभारी देणारा ठरला आहे. या विजयामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून अगामी जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी ते रिचार्ज झाले आहेत. रणवीर गायकवाड यांच्या विजया नंतर गायकवाड - सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण तालुक्यातील गावा गावात फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
kdcc bank result : पेरीडकरांचा करेक्ट कार्यक्रम, रणवीर गायकवाड यांनी काढला पराभवाचा वचपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 11:31 AM