राजाराम लोंढे :: कोल्हापूर ::कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असून, ठरावाच्या गोळाबेरजेस सुरुवात झाली आहे. काठावर बहुमत असणाऱ्या संस्थांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला असून, आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या नावे ठराव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता जिल्हा बॅँकेसह ‘गोकुळ’ची निवडणूक ही पक्षीय झालरीपेक्षा गटातटांतच होणार, हे निश्चित आहे.जिल्हा बॅँकेची निवडणूक २००४ मध्ये झाली होती. तत्कालीन संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वीच प्रशासक आले. जिल्ह्याची आर्थिक नाडी असल्याने या बॅँकेच्या निवडणुकीत नेते प्रतिष्ठा पणाला लावतात. मंत्री, खासदार, आमदार यांचेच पॅनल असल्याने येथे निकराची लढत पाहावयास मिळते. गेली निवडणूक कॉँग्रेस व राष्ट्रवादीत थेट झाली होती. राष्ट्रवादीने बॅँकेवर निर्विवाद सत्ता स्थापन केली. गेल्या पाच वर्षांत राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. आताही पक्षीय पातळीवर निवडणूक होणार नसून गटातटांतच होणार आहे. आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात टोकाचे मतभेद आहेत; त्यामुळे ते एकत्र येणे अशक्य आहे. राष्ट्रवादी एकसंधपणे सामोरी जाईल; पण कॉँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून येण्याची शक्यता असून कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पॅनल होऊ शकते. आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे एकत्रित येऊन मोट बांधण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप, जनता दल, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जनता दल, शेकाप हे राष्ट्रवादीचे पारंपरिक मित्र आहेत. शिवसेनेचे सहा आमदार असल्याने ते स्वतंत्र सुभा मांडतील, अशी अटकळ बांधली जात असली तरी संस्थात्मक पातळीवर ते अशक्य आहे; त्यामुळे ते कोणाबरोबर जातात हे औत्सुक्याचे आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांची राष्ट्रवादीशी जवळीक आहे; पण आमदार प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक, संजय घाटगे, नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादीबरोबर जाणे अशक्य आहे. ते व स्वाभिमानी राष्ट्रवादीऐवजी कॉँग्रेसबरोबर जाणे पसंत करतील. भाजपची संस्थात्मक पातळीवर फारशी ताकद नाही, तरीही वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेपानंतर ते राष्ट्रवादीबरोबर राहू शकतात. हेच समीकरण ‘गोकुळ’ मध्येही असेल.निकराची झुंज होणार!पक्षीय पातळीवर ही निवडणूक होणार नाही. विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचे थेट पडसाद पॅनल बांधणीपासून मतदानापर्यंत दिसणार आहेत. राज्यपातळीवर राजकारणात दबदबा निर्माण करण्यासाठीही ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक ही दोन्ही सत्ताकेंद्रे अतिशय महत्त्वाची असल्याने या संस्थांच्या निवडणुकीत निकराची झुंज पाहावयास मिळणार आहे. नरके, घाटगे यांचा प्रवेश शक्यसंचालकांची संख्या जरी कमी झाली असली, तरी आमदार चंद्रदीप नरके, समरजितसिंह घाटगे यांच्यासह आणखी काही नवीन चेहऱ्यांची दोन्ही पॅनलमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशी होणार जागांची विभागणीएकूण जागा : २१तालुका प्रतिनिधी : १२महिला : २अनुसूचित जाती/जमाती : १इतर मागासवर्गीय : १भटक्या विमुक्त जाती : १दूध संस्था, पाणीपुरवठा, हाउसिंग, मार्केटिंग प्रोसेसिंग, औद्योगिक, पतसंस्था, नागरी बॅँका, पगारदार नोकरांच्या पतसंस्था, व्यक्ती सभासद : ४यांची लागणार कसोटी...प्रकाश आवाडे व्ही. बी. पाटील निवेदिता माने डॉ. संजय पाटीलवसंतराव मोहिते भगवानराव सरनोबत बाबूराव हजारे राजू आवळेे किशाबापू किरूळकर.
‘केडीसीसी’ गटातटातच
By admin | Published: November 18, 2014 10:45 PM