राजाराम लोंढे - कोल्हापूर‘गोकुळ’प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या वळचणीलाच उभे राहण्याच्या तयारीत आहे. सहा आमदार असतानाही नेत्यांचा पैरा फेडण्याच्या नादात दुसऱ्याच्या मागून फरफटत जाण्याची वेळ शिवसेना कार्यकर्त्यांच्यावर आली आहे. शिखरसंस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षवाढीची नामी संधी आली होती; पण ‘सोयीच्या राजकारणा’ने पदापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची राजकीय ताकद या सहकारी संस्था आहेत. आजपर्यंतचे त्यांचे राजकारण या संस्थांभोवतीच फिरल्याने त्यांनी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत आपला दबदबा कायम राखला; पण गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक त्वेषाने बाहेर पडला आणि दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. दहापैकी तब्बल सहा आमदार शिवसेनेचे निवडून आले. उशिरा का असेना, पण पक्ष राज्यातील सत्तेत गेल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीने याच सत्तेचा वापर करून पक्ष ग्रामीण भागात पोहोचविला, तशी नामी संधी शिवसेनेला आली आहे; पण नेत्यांच्या कचखाऊ व सोयीच्या भूमिकेमुळे पक्षवाढीवर मर्यादा येत आहेत. ‘गोकुळ’, जिल्हा बॅँक, बाजार समिती ही तिन्ही सत्ता केंद्रे आगामी राजकारणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ‘गोकुळ’ निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील यांनी आपल्या घरात उमेदवारी घेऊन सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला. आमदार चंद्रदीप नरके यांची अरुण नरके यांच्यामुळे गोची झालेली आहे. आमदार प्रकाश आबिटकर, सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा दिला आहे. आमदार उल्हास पाटील व आमदार सुजित मिणचेकर यांची ‘नरोवा कुंजरोवा’ अशीच भूमिका राहिल्याने ‘गोकुळ’सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत ताकदीच्या कार्यकर्त्याला संधी मिळू शकलेली नाही. ‘गोकुळ’प्रमाणे जिल्हा बॅँकेतही तीच अवस्था आहे. येथे शिवसेना, भाजपच्या आमदारांनी दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना बरोबर घेऊन पॅनेल बांधणे गरजेचे होते. जय-पराजयापेक्षा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ताकदीने उतरले तर बाजार समिती हातात येण्यास फारवेळ लागणार नाही, पण शिवसेना नेत्यांनी स्वत:च्या सोयीपेक्षा पक्ष व कार्यकर्त्याला महत्त्व दिले तर हे होऊ शकते. भाजप करते, मग शिवसेनेला काय झालेभाजपचे जिल्ह्यात तीन आमदार असताना त्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत शेवटपर्यंत दबावाचे राजकारण केले. ‘स्वीकृत संचालक’ पदावर त्यांनी आपली ‘तलवार म्यान’ केली असली, तरी किमान सत्तारूढ गटावर दबाव टाकण्याचे काम तरी केले; पण सहा आमदार असताना एकाही जागेची मागणी या नेत्यांनी एकत्रितपणे न करता आपली सोय बघितल्याने कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आयते कोलीत हातात; तरी शांतताचएरव्ही दोन्ही कॉँग्रेसच्या कारभारावर भाषणात हल्ला करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयते कोलीत हातात आले होते. दोन्ही काँग्रेसच्या कारभारामुळेच बँकेवर प्रशासक आल्याने त्यांच्याविरोधात निवडणुकीत रान उठविण्याची संधी आली आहे; पण शिवसेनेचे वाघ डरकाळी फोडण्याऐवजी शांतच आहेत.
‘केडीसीसी’त शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या वळचणीला
By admin | Published: April 20, 2015 12:20 AM