कोल्हापूर : महापुराच्या संकटात मदतीचा हात देणाऱ्या विविध संस्था, स्वयंसेवकांबाबत कोल्हापूरकरांनी रविवारी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या (केडीएमजी) माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली. या आपुलकी, संवेदनशीलतेने संस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवक भारावले. ह्यकेडीएमजीह्णचा सामाजिक कार्याचा पॅटर्न कौतुस्कास्पद आणि अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.येथील महासैनिक दरबार हॉलमधील या कार्यक्रमास महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध संस्था, स्वयंसेवकांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, राजर्षी शाहू महाराज गौरव ग्रंथ देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संकटात असलेल्या आपल्या समाजबांधवांना कर्तव्य भावनेतून मदत करण्याची कोल्हापूरची परंपरा मनाला भावली. संकट आल्यावर काम करण्यापेक्षा संकट येऊच नये आणि ते आल्यास त्यावर लवकर पर्यायी मार्ग काढण्यासाठी नियोजन करावे लागेल. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी जिल्ह्याच्या विकासाचा मजबूत पाया सर्वजण मिळून घालूया, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.
अत्यंत नियोजनबद्धपणे केडीएमजीने काम केले असल्याचे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाच्या हातात हात घालून काम केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञता व्यक्त करणे हा कोल्हापूरच्या मातीचा गुण आहे.
सामाजिक भान ठेवून काम करण्यासाठी नेहमीच कोल्हापूरकर मदतीसाठी तत्पर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. यावेळी उज्ज्वल नागेशकर, आनंद माने, रवींद्र पाटील, युवराज पाटील, शीतल पाटील, सचिन शानबाग, महावीर सन्नके, आदी उपस्थित होते.
केडीएमजीमधील विविध ३१ संघटनांच्या वतीने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. रवि माने यांनी स्मृतिचिन्हाची संकल्पना मांडली. इंद्रजित नागेशकर यांनी प्रास्ताविक केले. ह्यक्रिडाईह्णचे माजी सचिव उत्तम फराकटे, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. राजीव लिंग्रज यांनी आभार मानले.या संस्थांचा, व्यक्तींचा सत्कारएनडीआरएफ टीम, मुंबई महापालिका (जेटिंग आणि सक्शन टीम), नवी मुंबई महापालिका स्वच्छता टीम, पुणे येथील रिलायबल पेस्ट कंट्रोल औषध फवारणी टीम, पुणे महापालिकेच्या पाणी टँकर टीम आणि अग्निशामक टीम, विलो पंपस टीम, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप (विजय आणि सागर पाटील), राठोड ज्वेलर्सचे चंद्रकांत राठोड, अर्थमुव्हर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर, सरोज कास्टिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडचे प्रणव जाधव, उद्योजक सचिन झंवर, फोर्टी वनर्स क्लब ऑफ कोल्हापूर, प्रायव्हेट हायस्कूल माजी विद्यार्थी १९७९ बॅच, कोल्हापूर राऊंड टेबल १५४, कोल्हापूर कॅटरिंग असोसिएशन पदाधिकारी आणि सर्व मदतनीस, महासैनिक दरबार हॉल, जितो संघटना, अशोक बेहरे, पार्था आयांगार, संजय प्रधान, अनिमा देशपांडे.
कोल्हापूरकरांकडून सन्मान, ताकद
या कार्यक्रमात एनडीआरएफचे निरीक्षक ब्रिजेशकुमार पांडे, नवी मुंबई महापालिकेतील सुधाकर वडजे, पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील प्रशांत गायकर यांनी मनोगत व्यक्त केले. महापुरात बचाव, मदतकार्य आणि पुरानंतर स्वच्छतेचे काम करताना कोल्हापूरकरांनी ताकद आणि सन्मान दिल्याचे त्यांनी सांगितले.
अशीही कृतज्ञता
सेंट्रल किचनद्वारे पूरग्रस्तांना जेवण पुरविले. हे जेवण करण्यासाठी कोल्हापूर कॅटरिंग असोसिएशनला मदत करणाऱ्या दहा महिलांना महापालिका प्रशासक बलकवडे यांच्या हस्ते साडी देऊन ‘केडीएमजी’ने कोल्हापुरी पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली.