कोल्हापूर : ‘ज्येष्ठ नेते अॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे कुठे आहे? त्याला हजर करायला सांगितले होते. जगात कुठेही ठेवा; पण माझ्या तारखेला तो हजर राहिला पाहिजे. कुठे आहेत तपास अधिकारी?’ अशा कडक शब्दांत शनिवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी तपास यंत्रणेच्या पोलिसांना खडसावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. ६ फेब्रुवारी रोजी ठेवली. पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड व डॉ. तावडे या दोघांची शनिवारी एकत्रित सुनावणी होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित गायकवाड याला न्यायालयात हजर केले. मागील सुनावणीत डॉ. तावडे याला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; परंतु पोलिसांनी तावडेला हजर केले नाही. दुपारी तीनच्या सुमारास (पान १ वरून) सुनावणीला सुरुवात होताच न्यायाधीश बिले यांनी ‘दोन नंबरचा आरोपी कुठे आहे?’ अशी विचारणा पोलिसांना केली. तावडेला हजर का केले नाही याची माहिती नसल्याने सरकारी वकील शिवाजीराव राणे काहीवेळ गडबडून गेले. सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे यांनी तावडे हा पुणे येथील येरवडा कारागृहात आहे. कारागृह प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे; परंतु त्यांनी उत्तर दिले नसल्याने आरोपीला हजर केले नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधीश बिले यांनी ‘आरोपीला हजर करा म्हणून सांगितले होते. आरोपी तुमच्या कोठडीत आहे. त्याला कळंबा कारागृहात का ठेवले नाही? येरवडा कारागृहाचे कारण सांगणे कितपत योग्य आहे? तपास अधिकारी कुठे आहेत? आरोपीला जगात कुठेही ठेवा; पण माझ्या तारखेला तो हजर राहिला पाहिजे,’ अशा कडक शब्दांत खडसावत कानउघाडणी केली. त्यावर सरकारी वकील राणे यांनी पुढील सुनावणीला आरोपीसह तपास अधिकारी सुहेल शर्मा यांना हजर करण्याची हमी दिली. दरम्यान, आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी साडेतीन महिने झाले तरी डॉ. तावडेला न्यायालयात हजर केलेले नाही; त्यामुळे त्याच्या वकीलपत्रावर मला सही घेता आलेली नाही, असे सांगितले. त्यावर न्यायाधीश बिले यांनी तुमच्या वकीलपत्रासाठी त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश मी दिले नव्हते. तो पानसरे खटल्यातील दुसरा संशयित आरोपी आहे. सुनावणीला त्याने हजर राहिले पाहिजे. तुम्हाला वकीलपत्रावर त्याची सही घ्यायची असेल तर कारागृहात जाऊन घ्या. त्याचा याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर २४ जानेवारीला सुनावणी आहे. त्यामुळे पुढील सुनावणी दि. ६ फेब्रुवारीला ठेवल्याचे न्यायाधीश बिले यांनी सांगितले. या सुनावणीला दोन्ही आरोपींना हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. कारागृह प्रशासनाचा अभिप्राय घेणार आरोपी समीरला कारागृहात जपमाळ, गोमूत्र व उदबत्ती हवी आहे. या वस्तू वापरण्यास त्याला मुभा द्यावी, अशी विनंती अॅड. पटवर्धन यांनी केली. त्यावर सरकारी वकील राणे यांनी आक्षेप घेत हे कारागृह प्रशासनाच्या नियमांत आहे, का पाहिले पाहिजे. त्यासाठी पुढील सुनावणीला कारागृह प्रशासन अधिकाऱ्यांना हजर करतो. त्यांचा अभिप्राय घेऊन न्यायालयाने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. न्यायालयाने राणे यांची विनंती मान्य केली.‘सनातन प्रभात’ला नोटीस आरोपी समीर गायकवाड याला ‘सनातन प्रभात’चे अंक वाचण्यासाठी हवे आहेत, ते त्याला द्यावेत, अशी विनंती अॅड. पटवर्धन यांनी न्यायालयास केली. न्यायाधीश बिले यांनी हे अंक पाहिले असता त्यामध्ये ‘सनातनच्या निरपराध साधकावर अन्याय होत आहे. हिंदुत्वाची मानहानी करणाऱ्यांना हिंदूराष्ट्रात दामदुपटीने शिक्षा देण्यात येईल, असा मजकूर होता. तो अॅड. पटवर्धन यांना वाचण्यास सांगितला. अशा आक्षेपार्ह मजकुराचे अंक आरोपीला वाचायला देणे कितपत योग्य आहे? अशी विचारणा करीत संबंधित वृत्तपत्राला नोटीस पाठविल्याचे न्यायाधीश बिले यांनी स्पष्ट करताच अॅड. पटवर्धन यांनीही ते मान्य केले.
तावडेला कोठेही ठेवा; पण कोर्टात हजर करा
By admin | Published: January 22, 2017 12:54 AM