कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पॅरोलवर व जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचनाही जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार गुन्हेगारांच्या गेल्या पाच वर्षांतील ‘कुंडल्या’ तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुका शांततेने व्हाव्यात यासाठी पोलीस प्रशासन विविध उपायोजना करीत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारांवर कारवाई वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गेल्या पाच वर्षांतील गुन्हेगारांची यादी तयार करून कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या पाच वर्षांत पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करा, त्यांच्यावर नजर ठेवा, हलचाली संशयास्पद असतील तर त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवा. जामीन अगर पॅरोलवर बाहेर असलेल्या गुंडांच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेऊन आवश्यक तेथे तातडीने कारवाई करा. तसेच पुढील टप्प्यात गुन्हेगारांचे गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड तयार करून त्यानुसार त्यांच्यावर कारवाईच्या सूचनाही बलकवडे यांनी दिल्या.