गडहिंग्लज : न्यायालयात गेले तरच न्याय मिळतो, अशी धारणा आजही समाजात आहे. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी न्यायाधीश आणि वकिलांवर आहे. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास व आदर अबाधित राखण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. राजेंद्र सावंत यांनी केले.येथील नूतन न्याय संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट होते. न्यायसंकुलाच्या भव्यदिव्य इमारतीची पूर्तता हे सर्वांच्या प्रयत्नांचे फलित आहे, असे सावंत यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, वकिली हा व्यवसाय नसून पेशा आहे. त्यामुळे वकिलांनी आपले कौशल्य व ज्ञान वाढवून पक्षकारांना वेळेवर व योग्य न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे. न्या. अवचट म्हणाले, गडहिंग्लज शहराला वेगळी ओळख आहे. २० वर्षांत एक रुपयाचीही भाडेवाढ न करता नगरपालिकेने जिल्हा न्यायालयासाठी इमारत उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पालिकेचे आभारी आहोत.कार्यक्रमास नगराध्यक्षा स्वाती कोरी, आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ विधितज्ज्ञ डी. बी. भोसले, शिवाजीराव चव्हाण, न्यायाधीश यामिनी बोरावके, आनंद व्होडावडेकर, संग्राम काळे, सतीश चंदगडे, राजेंद्र रोटे, रवी नडगदल्ली, मकरंद कुलकर्णी, श्रीनिवास पटवर्धन, धैर्यशील नलवडे, सुभाष घाटगे, अभिजित देसाई, कोकितकर, किसनराव कुराडे, मल्लाप्पाण्णा चौगुले, अॅड. कुंडलिक गावडे, ंआदी उपस्थित होते. ‘न्यायदीप’ या स्मरणिकेचे प्रकाशन न्यायमूर्ती सावंत यांच्या हस्ते झाले. गडहिंग्लज वकील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पोवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी आभार मानले. मीरा जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
न्याय संस्थेवरील विश्वास अबाधित राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2017 11:53 PM