लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने इचलकरंजी १००, वडगाव ५० व शिरोळ तालुक्यात १०० बेडचे लहान मुलांसाठीचे हॉस्पिटल सुरू करणे, यासाठी सर्व बालरोगतज्ज्ञांचा एकत्र क्लब स्थापन करणे, शासकीय रुग्णालयांत आवश्यकतेनुसार सेवा देणे व स्वत:च्या रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त बेड व त्यासाठी लागणारे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर याची सुविधा करावी, अशा सूचना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिल्या. त्यावर सर्व बालरोगतज्ज्ञांनी समर्थता दर्शविली.
शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठक शुक्रवारी येथील प्रांत कार्यालयात झाली. त्यामध्ये तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यासाठी आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. पूर्वतयारी व उपाययोजना यासंदर्भात आढावा घेण्याबरोबरच दोन्ही तालुक्यांतील सर्व बालरोगतज्ज्ञ यांना एकत्रित क्लब स्थापन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर या क्लबच्या माध्यमातून इचलकरंजी, पेठवडगाव व शिरोळ येथे हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यावर दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
कोविडनंतर होणारे त्रास व अन्य आजार यासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचेही नियोजन करून ठेवण्याबाबत निर्णय झाला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार, डॉ. सुहास कोरे, डॉ. सुनीलदत्त संगेवार, तहसीलदार शरद पाटील यांच्यासह पेठवडगाव, हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी येथील बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते.
फोटो ओळी
२८०५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजी प्रांत कार्यालयात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठक प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार, डॉ. सुहास कोरे, डॉ. सुनीलदत्त संगेवार, तहसीलदार शरद पाटील आदी उपस्थित होते.