कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धावेळी, हिटलरच्या अमानुष छळापासून वाचण्यासाठी कोल्हापूर संस्थानच्या आश्रयाला आलेल्या पोलंडवासीयांच्या आठवणींचा ठेवा संग्रहालय रूपात जतन करण्यात येणार आहे. पोलंडवासियांच्या वास्तव्याच्या काळातील वस्तू, छायाचित्रे या संग्रहालयात ठेवण्यात येणार असून, याद्वारे भारत-पोलंडच्या मैत्रीचे नाते अधिक दृढ होणार आहे.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अनेक देशांनी निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रय देण्याचे नाकारले मात्र भारतात मात्र जामनगर आणि कोल्हापूर संस्थानने त्यांना आश्रय दिला. पोलंडच्या लोकांसाठी कोल्हापूर संस्थानामार्फत कोल्हापूरपासून ५ किमी अंतरावर वळिवडे कॅम्प म्हणजे आताचे गांधीनगर येथे कुटुंब छावण्या (बरॅक) बांधण्यात आल्या. येथे पाच हजार पोलंडचे नागरिक १९४३ ते ४८ या कालावधीत राहायला होते.
एवढेच नव्हे तर गरजेच्या वस्तूंसाठी बाजारपेठही त्यांना पुरविण्यात आली; त्यामुळे ही छावणी एक सुसज्ज वसाहत म्हणून नावारूपाला आली. त्यांनी येथे बागा फुलविल्या, रस्त्यांना पोलिश नावे दिली. शाळा, दवाखाना आणि एक चर्च, थिएटरही उभारले.येथे अनेकांचा जन्म झाला, कित्येकांचे बालपण गेले; त्यामुळे कोल्हापूरच्या वळिवडे छावणीबरोबर या पोलिश नागरिकांचे भावनिक नाते जडले आहे. म्हणूनच त्यांच्या आठवणी. संग्रहालयपाने जपण्यात येणार आहेत.
कँप वळिवडे येथील जीवन आणि काळ याची आताच्या आणि पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. येथे त्या काळातील छायाचित्रे, चित्रे व महत्त्वाच्या वस्तू व साहित्य ठेवले जाणार आहे. येत्या वर्षभरात हे संग्रहालय उभे राहील.साहित्यासाठी आवाहनया वसाहतीत आपल्या वस्तू विकण्यासाठी कोल्हापुरातून अनेक व्यावसायिक येथे यायचे. पद्मा पथकमधील खेळाडू व पोलिश नागरिकांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगायचा. परदेशी, सोळंकी, गायकवाड घराणे, काशीकर कुटुंब असे अनेक लोक पोलंडवासीयांच्या सहवासात होते. ज्या नागरिकांकडे त्यांच्याशी निगडीत छायाचित्रे, तत्कालीन वस्तू अथवा साहित्य असतील, तर ते संग्रहालयासाठी द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.