लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शासनावर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. समाजाने हे आरक्षण आताच मिळावे ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नाही तर पुन्हा कधीही नाही, अशी अवस्था निर्माण झाल्याने समाजातील सर्व पोटजाती विसर्जित करून फक्त धनगर हीच जात मानून एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आमदार रामहरी रूपनर यांनी सांगितले.धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच याबाबत समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणीत मल्हार सेना व युवक संघटनेच्या वतीने धनगर आरक्षण मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी आमदार रूपनर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे हे होते.आमदार रूपनर म्हणाले, धनगर समाजाची २७ पोटजातींमध्ये विभागलेली ताकद फक्त धनगर समाजाच्या नावाखाली एकत्र यावी. बारामतीत समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला होता. त्यामुळे आरक्षण मिळू शकले नाही. आता आरक्षण मिळविण्यासाठी शासनावर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. निवडणुका नजीक आल्या आहेत. त्यासाठी राज्यभरात असणाऱ्या एकूण १४ टक्के समाजाने एकसंध राहून लढा निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.बबनराव रानगे म्हणाले, सर्वच पक्षांच्या सरकारांनी धनगर समाजाला फसविले आहे. आता समाजाने एकसंध होऊन आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही. त्यासाठी सर्व पोटजाती बाजूला ठेवून एकसंध व्हा.अहिल्यादेवी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पाताई गुलवाडे म्हणाल्या, भविष्यात आपल्या मुलाबाळांचा विकास करण्यासाठी आरक्षणाच्या लढाईत रस्त्यावर उतरावे लागेल. बारामतीत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजाला शेळी-मेंढीप्रमाणे समजल्याने समाज त्यांना योग्य वेळी खाली खेचेल, असाही इशारा त्यांनी दिला. महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे यांनी स्वागत केले. नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले; तर मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश पुजारी, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, आदींनी आपले विचार मांडले. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, नगरसेवक राजसिंह शेळके, मल्लू खोत, बापूसाहेब ठोंबरे, राजू दळवाई, कमलाकर जानकर, बाजीराव शेळके, प्रल्हाद देबाजे, बाळासाहेब दार्इंगडे, शहाजी सिद्ध, बाबूराव बोडके, नाना पुजारी, आदी उपस्थित होते.सत्तास्थाने मिळाल्यानंतर काहींना समाजाचा विसरधनगर समाजातील काही प्रवृत्ती आंदोलनाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा करतात; पण सत्तास्थाने मिळाल्यानंतर त्यांना समाजाचा विसर पडतो, अशी टीका कोणाचेही नाव न घेता करून आमदार रूपनर यांनी, अशा प्रवृत्तींना समाजाने वेळीच ओळखून बाजूला सारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
पोटजाती बाजूला ठेवा, आरक्षणासाठी एकसंध व्हा
By admin | Published: June 25, 2017 1:16 AM