कोल्हापूर : धर्मस्थळ व कोल्हापूर यांचे ऋणानुबंध जुने असून, धर्मस्थळ ट्रस्टच्या माध्यमातून कर्नाटकात राबविलेल्या योजना महाराष्टÑातही राबविल्या जातील, अशी ग्वाही देत समाजोन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सुरेंद्रजी हेगडे यांनी केले.दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोर्डिंग व समस्त दिगंबर जैन समाज यांच्या वतीने रविवारी परमपूज्य भट्टारकरत्न स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. पट्टाभिषेकास ५० वर्षे पूर्ण झाल्याने दीक्षा सुवर्णमहोत्सव व त्यांनी ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अमृत महोत्सवानिमित्त लक्ष्मीसेन महास्वामी यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.सुरेंद्रजी हेगडे म्हणाले, श्रवणबेळगोळ येथे ५ मार्चला बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा होत असून, त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, भारत हा धर्मप्रधान देश आहे, पण अलीकडे प्रत्येकाच्या विचारांत बदल होत आहे. तरीही परदेशात भारतीय संस्कृती व धर्माबद्दल कमालीचे कुतूहल पाहावयास मिळते. भगवान महावीरांनी अहिंसा, सत्याचे तत्त्वज्ञान दिले, त्यापासून आपण भरकटत चाललो आहोत. भट्टारकरत्न मठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे.रावसाहेब पाटील म्हणाले, शिक्षणात आधुनिक भारत घडविण्याचे ताकद असल्याने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. दक्षिण सभेच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्यक्षेत्रात खूप कामे केली आहेत.माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, परिस्थिती बदलल्याचे भान समाजातील युवकांनी ठेवले पाहिजे. मंदिरे जरूर उभारा, संस्कृती जपण्यासाठी पंचकल्याण महोत्सव साजरे करा; पण त्यापेक्षाही शिक्षणाचे महत्त्व आहे. कर्नाटकात लिंगायत मठाच्या माध्यमातून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या समाजातील मुलांनी मेडिकल, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले; त्या तुलनेत आम्ही कुठे आहोत? काळाप्रमाणे आपण बदलणार की नाही? असा सवालही त्यांनी केला. यावेळी लक्ष्मीसेन महास्वामी यांचा गौरव अंक, विविध ग्रंथ, पुस्तके व सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे यांनी स्वागत केले. प्रा. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक किरण शिराळे, राहुल चव्हाण, प्रज्ञा उत्तुरे, सरिता मोरे, महावीर देसाई, आदी उपस्थित होते. संजय शेटे यांनी आभार मानले.