कोल्हापूर : ग्रामरोजगार सेवकांना महिन्याला इतर राज्यांप्रमाणे १८००० हजार रुपये वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार सेवक संघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचा लवकरात लवकर विचार न झाल्यास सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.संघाच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सदस्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात १९७२ ‘रोहयो’ सुरु झाली. केंद्र सरकारने २००५ मध्ये इतर राज्यात अंमलबजावणी केली.परंतु २००५ च्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे.
यामध्ये सुधारणा व्हावी. ग्रामरोजगार सेवकांना किमान वेतन १८ हजार रुपये द्यावे, हे वेतन संबंधितांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करावे, ‘मनरेगा’ ही स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ शासकिय सेवेत सामावून घ्यावा अशा विविध मागण्यांचा विचार करुन शासनाने न्याय द्यावा.आंदोलनात दादू सावंत, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, तानाजी पाटील, अनिल ईर, हसन मुल्लाणी, बाळासो कांबळे, दयानंद सपकाळ, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता.