कोल्हापूर : मिळालेल्या यशात समाधानी राहू नका. यात वेगळेपण शोधून कार्यरत राहा. पुढील यशाकडे ध्येयाने बघा. ध्येयपूर्तीसाठी मनातील बांधणी शेवटपर्यंत डोक्यात ठेवून कार्यरत राहा, असे आवाहन एस. बी. रिसेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर यांनी मंगळवारी येथे केले. शासकीय तंत्रनिकेतनच्या २२ व्या पदविका प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील तंत्रनिकेतनच्या खुल्या सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंत्रनिकेतनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व तंत्रशिक्षणचे सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार होते. यावेळी संचालक शिरगावकर म्हणाले, पदविका मिळालेल्या स्नातकांनी त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील यशाचा पहिला टप्पा पार केला आहे. या यशात समाधानी न राहता यात वेगळेपण शोधून पुढील यशासाठी ध्येयाने कार्यरत राहावे. उद्योगक्षेत्राला चांगल्या कामगार, मनुष्यबळाची गरज आहे. तंत्रनिकेतनमधील जे विद्यार्थी पदविकेसहीत व्यक्तिमत्त्व विकास साधून आमच्याकडे येतील ते उद्योगक्षेत्राला पुढे नेण्यास बळ देतील.सहसंचालक नंदनवार म्हणाले, स्नातकांनी आपल्या जीवनात कृती, उक्तीने पदविकांची प्रतिष्ठा राखावी. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रत्येक विद्याशाखेच्या प्रत्येकी १० स्नातकांना प्रातिनिधिक स्वरूपात पदविका प्रदान करण्यात आल्या. यावेळी परीक्षा नियंत्रक ए. एन. देवडे, तंत्रनिकेतनच्या नियामक मंडळाचे सदस्य किरण पाटील, ए. बी. पर्वते-पाटील, विक्रमसिंग शिंदे, आर. जे. बलवान, द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फौंड्रीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, प्रा. ओ. एम. दानोजी, एस. एस. बिरजे, व्ही. के. हर्लापूर, डी. एम. गर्गे, डी. के. लामतुरे, पी. पी. खेडकर, के. ए. चव्हाण, एस. एम. मांडरे, आर. एल. डोईफोडे, आदी उपस्थित होते. प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी अहवाल वाचन केले. शैक्षणिक समन्वय अधिकारी यू. एम. कारखानीस यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रारंभी विद्वत्सभा सदस्यांची मिरवणूक काढली. अनेक स्नातकांनी पदविका मिळाल्याचा आनंद मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी घेऊन व्यक्त केला. कार्यक्रम संपल्यानंतर तंत्रनिकेतनच्या परिसरात त्यांच्या गप्पा आणि फोटोसेशन सुरू होते. +स्पर्धेमुळे उद्योगातील प्रशिक्षण आवश्यकसध्याच्या स्पर्धात्मक युगात निव्वळ पदविकेच्या जोरावर चांगली नोकरी मिळविणे अत्यंत कठीण आहे, ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी पदविकेचे शिक्षण घेत असतानाच कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास साधणे आवश्यक आहे, असे व्यवस्थापकीय संचालक शिरगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी पदविकेच्या शिक्षणासह उद्योगक्षेत्रात जाऊन ज्ञान, प्रशिक्षण घ्यावे. बहुश्रुत, अवांतर वाचन करणे महत्त्वाचे आहे.६३४ स्नातकांना पदविका प्रदानस्थापत्य अभियांत्रिकी (१४७), यंत्र अभियांत्रिकी (१८९), विद्युत अभियांत्रिकी (६३), औद्योगिक अणुविद्युत (४८), अणुविद्युत व दूरसंचार (१०४), शर्करा उत्पादन तंत्र (१२), माहिती तंत्रज्ञान (४६), धातू अभियांत्रिकी (२५), अशा एकूण ६३४ स्नातकांना पदविका प्रदान केल्या.
ध्येयपूर्तीसाठी मनातील बांधणीनुसार कार्यरत राहा
By admin | Published: March 01, 2017 12:07 AM