कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा अत्यंत मोठा आहे. त्यात मंदिराच्या निमित्ताने शहराचा विकास साधायचा असे नियोजन आहे; पण आराखड्याचा फाफटपसारा वाढविण्याआधी केवळ मंदिर आणि भाविकांच्या सोयी-सुविधा केंद्रस्थानी ठेवून विकास करणे गरजेचे आहे. एकदा मंदिराचा विकास होऊन भाविकांना सोयी-सुविधा मिळाल्या की शहराचा विकास आपोआप होईल. पूर्वी मंदिराचा आराखडा १२० कोटींचा होता. आता तो २५५ कोटींवर आला आहे. यात शहरांतर्गत व बाह्य रस्ते, गार्डन अशा कितीतरी अनावश्यक गोष्टींचा समावेश आहे. २५५ कोटींपैकी प्रत्यक्ष मंदिर आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी किती पैसा वापरला जाणार आहे, हे स्पष्ट नाही. आधी मंदिराच्या सौंदर्याचे जतन व संवर्धन केले जावे, भाविकांसाठी यात्री निवास, वाहनांच्या पार्किंगची सोय आणि दर्शन मंडप आणि त्याच ठिकाणी स्वच्छतागृहाची प्राधान्याने उभारणी केली पाहिजे. आराखड्यानुसार मंदिराभोवतीची जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यात १०८ कुटुंबे आणि व्यापारी बाधित होणार असल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात येथे त्याहीपेक्षा जास्त कुळे, पोटकुळे, व्यापारी आहेत. त्यांचे पुनर्वसन नक्की कोठे केले जाणार आहे, हे आराखड्यात स्पष्ट नाही. मंदिराचा विकास व्हायला हवा; पण नागरिकांना अंधारात ठेवून नको. सद्य:स्थितीत नागरिकांना आराखड्यात नेमके काय आहे, हे अजूनही माहीत नाही. मग कुठेतरी अफवा पसरतात, विरोध सुरू होतो. असे व्हायचे नसेल तर सर्वांना विश्वासात घ्यायला हवे. - राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टमंदिर हे देवतेच्या आराधनेचे स्थान असते; पण अंबाबाई मंदिर आणि बाह्य परिसरात भाविक पाच मिनिटेसुद्धा शांत बसू शकत नाही. पठण, ध्यान करू शकत नाही. त्यामुळे मंदिराचा परिसर अधिकाधिक प्रशस्त कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. देवस्थानच्या कार्यालयासमोरील कारंजा काढून तेथेही भक्तांना बसण्याची सोय करता येऊ शकते.
मंदिर केंद्रस्थानी ठेवूनच विकास हवा
By admin | Published: June 16, 2016 12:31 AM