कोल्हापूर : महानगरपालिकेतील इलेक्ट्रीक विभागात घडलेल्या केंबळे घोटाळ्यातील नुकसानीची वसुली करावी, अशी मागणी बुधवारी माजी नगरसेवक व या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष दिलीप शेटे यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
इलेक्ट्रीक विभागात झालेल्या व गाजलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कनिष्ठ अभियंता चंद्रकांत केंबळे व विभाग प्रमुख पोतदार हे दोषी असल्याचे चौकशीत सिद्ध झाले होते. या समितीचा अहवाल २००२ मध्ये सभागृहात मांडण्यात आला. पोतदार यांनी त्याच वेळी आत्महत्त्या केली. केंबळे यांची पत्नी यात कॉन्ट्रॅक्टर होती. याबाबत या दोन्ही दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. महापालिकेच्या आर्थिक नुकसानाची वसुली करण्याबाबत मी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु तत्कालीन आयुक्तांनी हे प्रकरण दाबून ठेवले. फायली बासनात गुंडाळून ठेवल्या. आता अठरा वर्षे झाली, अद्याप वसुली झालेली नाही. ती करण्यात यावी, असे दिलीप शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे.