लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : कामानिमित्त वर्षभर बाहेरगावी असलेले चाकरमनी गणरायाच्या आगमनापूर्वीच गावात दाखल होतात. मात्र, परदेशात असलेल्या अनेकांना या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही. चंदगड तालुक्यातील अनेक युवक कामानिमित्त केनियात वास्तव्यास आहेत. त्यांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करून आपली परंपरा जोपासली आहे.
केनिया सरकारमध्ये सध्या मंत्री असलेले मूळचे भारतीय डॉ. मिश्रा यांची मदत घेऊन सुधीर पाटील (म्हाळेवाडी), चंदू मिलके, प्रकाश जट्टेवाडकर (मलतवाडी), नामदेव केसरकर (हलकर्णी), नेमिनाथ देवण्णावर (चिक्कोडी), शिवानंद कोरे (निपाणी) या तरुणांनी पुढाकार घेऊन केनियात गणेशाची प्रतिष्ठापना केली.
ही तरुण मंडळी दहा दिवस मनोभावे गणेशाची पूजा करतात. गणरायाच्या आवडीचे मोदक, नैवेद्य बनविले जाते. आकर्षक सजावट करून सकाळ-संध्याकाळ बाप्पाची आरतीही केली जाते. हागणेशोत्सव पाहण्यासाठी परिसरातील केनियन व भारतीय नागरिक गर्दी करीत आहेत.